

आसनगाव (शहापूर, ठाणे): मनोहर पाटोळे
शहापूर तालुक्यातील खर्डी परिसरातील दहिगाव येथील ऐतिहासिक शिवमंदिरामध्ये श्रावणी सोमवारनिमित्त शिवभक्तांची आणि भाविकांची अलोट गर्दी होते. या मंदिरासमोर पेशवेकालीन कमळ तलाव आहे. या तलावामुळेच या मंदिराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले असून हा तलाव भाविक भक्तांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे.
सभोवताली जॉगिंग ट्रॅक बनविला आहे. येथे ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी देखील आसन व्यवस्था असून भाविकांना तलावात उतरण्यासाठी घाट बनविण्यात आला आहे. या ठिकाणी पार्किंग, तसेच स्वच्छतागृहे बनविण्यात आली आहेत.
मंदिराच्या समोर तत्कालीन खासदार सुरेश टावरे यांच्या खासदार निधीतून प्रशस्त सभागृह बनविण्यात आले आहे. या ठिकाणी पाण्याचे कारंजे, एक नवीन सभागृह देखील बनविण्यात आले आहे.
शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी पर्यटन विकासमधून 1 कोटी 13 लाख रुपयाचा निधी मंजूर केल्यामुळे या ठिकाणी विविध विकास कामे करण्यात आली आल्याने श्रावणी सोमवारी शिवभक्त भाविकांची अलोट गर्दी या ठिकाणी पाहावयास मिळते. यामुळे या शिवमंदिरामध्ये येणार्या शिवभक्तांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही.
या शिवमंदिराच्या मागच्या बाजूला गावदेवीचे सुसज्ज मंदिर असून ही देवी नवसाला पावते, अशी येथील ग्रामस्थांची भावना असून या ठिकाणी देखील भाविक मोठ्या प्रमाणात भेट देऊन मनोभावे पूजा अ?र्चा करून आपल्या मनातील इच्छा प्रकट करतात. येथील ग्रामस्थांच्या वतीने
शिव मंदिरात हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, हे कार्यक्रम नित्यनेमाने केले जातात, गावात वारकरी संप्रदायाचे भक्त देखील मोठ्या प्रमाणात असून खर्डी परिसरातील एक आदर्श गाव म्हणून दहिगाव गावाची ओळख आहे.
या ठिकाणी जाण्यासाठी मध्ये रेल्वेच्या शहापूर तालुक्यातील खर्डी स्थानकात उतरावे लागते तसेच मुंबई-नाशिक महामार्गावरून खर्डी गावातून 4 किलो मीटर अंतरावर हे शिवमंदिर आहे, खर्डीमधून प्रवाशी वाहतूक करणार्या जीप, रिक्षा, तसेच एसटी बसची व्यवस्था आहे.