

रायगड : महाड पासून 8 किमी अंतरावर महाड-म्हाप्रळ रस्त्यावर खाडीपट्टयातील गोठे बुद्रुक गाव असून या गावामध्ये स्वयंभू गोठेश्वर महादेव मंदिर वसलेले आहे. या मंदिराचे उघड्यावर असलेले श्री नंदीचे अवशेष येथील ग्रामस्थ हभप कै.शिवराम पवार यांना दिसून आले आणि तेव्हापासून ते येथील नंदीच्या मुर्तीची पूजा करत आहेत. आता हे मंदिर कळसासह कौलारू छताखाली गोठे बुद्रुक ग्रामस्थ व मुंबईकर ग्रामस्थांच्या श्रमदानातून उभे आहे. श्रावण महिन्यातील श्रावणी सोमवारी परिसरातील शिवभक्त अभिषेक व बेल वाहण्यासाठी येथे गर्दी करित असतात. सयंभु गोठेश्वर देवावर श्रध्दा अपंरपार असल्याचे पाहायला मिळते.
गावातील हभप कै. शिवराम गोपाळ पवार व श्री. शंकर रामजी पवार हे मुंबई येथे नोकरी निमित्त वास्तव्यास होते. त्यानंतर त्यांना आपल्या गावाची ओढ लागल्याने ते आपल्या गावी आले व शेती करू लागले. अशातच गावाशेजारी घनदाट जंगलात त्यांना नंदीची पाषाणाची व इतर देवतांच्या मुर्त्या उघड्यावर आढळून आल्या, तेव्हापासून ते या मूर्त्यांची 3 ते 4 वर्ष पूजा करीत होते. त्यांनी सर्व गावकरी व मुंबईकरांची बैठक घेऊन मंदिरात शिवपिंडी बसविणे व मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा संकल्प केला व सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने उघड्यावर असणार्या या मंदिराची कळसासह कौलारू भव्य बांधकाम करून 9 फेब्रु. 1980 साली जीर्णोद्धार केला.
याकामी मुंबईतील केमिस्ट व्यावसायिक व शिवभक्त किशोर रहेजा यांनी पिंडी देण्याचे कबुल केले व सर्व ग्रामस्थांच्या मदतीने, श्रमदान करून या मंदिराचे बांधकाम करण्यात आले. आज हे मंदिर निसर्गरम्य झाडीझुडपात वसलेले आहे. सदरचे मंदिर प्राचीन स्वयंभू असून मंदिराची नोंद गावात शासकीय दप्तरी ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध असल्याचे स्थानिक सरपंच गार्गी घुले यांच्याकडून सांगण्यांत आले आहे.
गोठे बुद्रुक, गोठे खुर्द व सव गाव हे निसर्गरम्य असून बहुतांश ग्रामस्थ शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. अनेक चाकरमानी मुंबई, पुणे मध्ये नोकरी करित असून दरवर्षी सणावारीला या मंदिराच्या दर्शनासाठी गावाकडे येत असतात. ह्या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वत्र हिरवीगार भात शेती तसेच कौलारू टुमदार घरे असून गोठे बुद्रुक या गावची लोकसंख्या 950 च्या आसपास असून गावामध्ये अनेक सुखसुविधा उपलब्ध आहेत.
गावाच्या कडेने गेलेली महाडची जलवाहिनी सावित्री नदी याच गावाला खेटून जात असून पुढे बाणकोट खाडीला मिळते. गावामध्ये स्वयंभू गोठेश्वर महादेव मंदिरासह श्री जाकमाता, श्री विठ्ठल रखुमाई व हनुमान अशी मंदिरे आहेत. महाडच्या छबिना उत्सवामध्ये या गावातून जाकमातेची पालखी व सासणकाठी पायी महाडमध्ये विरेश्वराच्या भेटीसाठी दरवर्षी जात असते.
अनेक वर्षाची ही परंपरा आज सुध्दा ग्रामस्थ तरूणांनी जिवंत ठेवली आहे. असा भक्तीचा वसा मोजक्या ठिकाणी पहावयास मिळतो. मात्र, महाड सारख्या ग्रामीण भागात पारंपारिक पध्दतीने भक्तीचा वसा जसाच्या तसा जपला जात आहे या महाड तालुक्याचे वैशिष्ठ्य म्हणावे लागेल.