

खानिवडे: सध्या हवामानात अनेक दिवसांपासून बदल झालेला जाणवत आहे. पहाटे धुक्याची चादर, त्यातून सूर्याचे डोकावणे, नंतर कोवळे ऊन,तर क्षणात आकाशात दाटून आलेले ढग, यामध्ये अधून मधून जोरदार पावसाच्या सरी. असे विचित्र वातावरण सद्ध्या सर्वजण अनुभवत आहेत. यामुळे यंदा खरिपाच्या शेतीचे नुकसान झाले आहे.
वातावरणातील बदलामुळे शेतीवर परिणाम झाल्याचे चित्र आहे. मात्र मागील सहा महिन्यांपासून सतत ओलावा टिकून राहिल्याने फळझाडांना विशेषतः आंबे,शेवगा यांना आता मोहोर व फुलोरा येण्याची वेळ असताना चक्क नवी पालवी फुटू लागली आहे. तर लांबलेल्या पावसामुळे रब्बी हंगाम सुद्धा लांबला आहे.
वास्तविक दरसाल ऑक्टों हिट च्या प्रभावाने खरिपाची काढणी, झोडणी ही कामे उरकून रब्बी ची उखळणी व पेरणी करण्याची लगबग सुरू होते.मात्र यंदा खरिपाच्या पिकांचा कालावधी संपूनही ती पिके अजून सुरू असलेल्य पावसामुळे अध्याप शेतातच आहेत.ती परिपक्व पिके धड काढता येत नाहीत व ठेवता ही येत नाही अशी शेतीची स्थिती असल्याने दरसाल ऑक्टोंबर व नोव्हेंबरच्या मध्याला रब्बीची उखळणी आटोपणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा शेतात औत किंवा ट्रॅक्टर घालणे शक्य होत नाही इतका ओलावा आहे. त्यात दरसाल होणाऱ्या भाजीच्या वाडीलाही अद्याप असलेला ओलावा परिणामकारक ठरला आहे.
यंदा अजून कांदा, मिरची,मुळा ,टोमॅटो,चवळी,वांगी,भेंडी,गवार ही पिके लांबणीवर पडली आहेत.याचबरोबर वसईचा अत्यंत चवीचा हिरव्या भाजीतील पावटा , लाल वाल जो यावेळेस कमी अधिक प्रमाणात बाजारात यायचा त्याची रोपे आता बांधावर उगवू लागली आहेत.त्यामुळे कठवळ वर्गातील हरभरा,वाल,तूर,तीळ,उडीद ,मूग हिंपिके सुद्धा लांबणीवर पडली आहेत.त्यात एकाच दिवसात वसईचे वातावरण ढगाळ,धुके,पाऊस,ऊन असे सुरूच असल्याने अजून किती काळ खरिपाची भातशेती कापणीशीवाय ठेवावी लागेल याचा अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे पुढील रब्बी हंगाम लागवड वेळेवर करता येईल का याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.दरम्यान या वातावरण बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर देखील परिणाम होत असल्याचे चित्र आहे.
हवामान अंदाज, पालघर
3 नोव्हेंबर रोजी प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई द्वारे देण्यात आलेल्या हवामान अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला होता.मात्र तो पाऊस 4 नोव्हेंबर रोजी वेगवेगळ्या ठिकाणी पहाटे ते दुपारच्या वेळी बरसला. याचबरोबर 3 नोव्हेंबरच्या पुढील दोन दिवस बहुतांश भागात उघडीप राहील फक्त एक दोन ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून 6 नोव्हेंबर पासून पालघर जिल्ह्यात पूर्णपणे उघडीप राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.