

वाडा : मनोर - वाडा महामार्गावर पाली व करळगाव असे दोन नद्यांवरील पुल कमकुवत झाले असून अवजड वाहनांना या महामार्गावर मज्जाव करण्यात आला होता. बंदी झुगारून या पुलांवरून राजरोस अती अवजड वाहतूक सुरूच असून हमरापूर फाट्यावर वाहनांची झाडाझडती सुरू असल्याचे बुधवारी पाहायला मिळाले. अती अवजड वाहनांवर कारवाई करण्यात आली की कारवाईच्या नावे केवळ दिखावा करण्यात आला याबाबत अनेकांनी शंका उपस्थित केली आहे.
पाली गावाजवळ पिंजाळ व करळगाव जवळ देहर्जे नदीवरील पूल जुने व कमकुवत झाले असून नुकताच या पुलांची तपासणी व दुरुस्ती करण्यात आली होती. अवजड वाहतुकीसाठी या मार्गावर 34 टनांहून अधिक क्षमतेच्या वाहनांसाठी बंदी आहे मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या बंदीला कुणीही जुमानत नसल्याचे पहायला मिळत आहे. वाडा परिसरातील देसई, कंचाड, खरिवली अशा विविध भागातून अत्यंत अवजड हायवा ट्रक दिवसरात्र येजा करतात असे लोकांचे म्हणणे आहे.
34 टन क्षमता असणाऱ्या रस्त्यावरून अनेकदा 50 ते 60 टनांहून अधिक अवजड वाहने हाकली जात असून आरटीओ विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पालघर, वसई - विरार, बोईसर भागात महामार्गांच्या कामासाठी गौणखनिज व क्रेशर साहित्य घेऊन जाणाऱ्या अवजड वाहनांची रेलचेल अनेक वर्षांपासून सुरू आहे.
तालुक्यातील रस्त्यांची यामुळे अतिशय दयनीय अवस्था झाली असून महामार्गावरील पूल यामुळे संकटात सापडले आहेत. बुधवारी हमरापूर गावाजवळ पोलिसांच्या मार्फत वाहनांची तपासणी सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले असून याबाबत नक्की काय कारवाई झाली हे कळू शकले नाही.