Thane Politics: ठाण्यात महायुतीतच वादाची ठिणगी! भाजप विरोधी पक्षाच्या भूमिकेत; क्लस्टर, करवाढीवरून मतभेद स्पष्टपणे उघड

क्लस्टर आणि करवाढीवरून शिवसेना आणि भाजपमधील मतभेद स्पष्टपणे उघड झाले आहेत.
TMC Budget
TMC Budgetpudhari photo
Published on
Updated on

दिलीप शिंदे

ठाणे: ठाणे महापालिकेच्या राजकारणात सध्या एक अत्यंत रंजक आणि वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. सत्तेत एकत्र असलेले शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे. विशेष म्हणजे, सत्तेत सहभागी असूनही भाजप आक्रमक विरोधी पक्षाची भूमिका बजावताना दिसत आहे.

तर दुसरीकडे, खऱ्या अर्थाने विरोधी पक्षात असलेली राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) मात्र या दोन्ही पक्षांच्या भांडणात केवळ 'बघ्याची भूमिका' घेत शांत असल्याचे चित्र आहे. क्लस्टर आणि करवाढीवरून शिवसेना आणि भाजपमधील मतभेद स्पष्टपणे उघड झाले आहेत.

TMC Budget
Dombivli Crime News: डोंबिवलीत उच्चभ्रू लोकवस्तीत चालणारे छुपे रॅकेट उघड

ठाण्यातील रखडलेल्या क्लस्टर पुनर्विकासाला गती देण्यासाठी 'ठाणे क्लस्टर विकास कंपनी' स्थापन करण्याचा आणि मालमत्ता कर वाढीच्या मंजुरीनंतर भाजपने सभागृहाबाहेर दरवाढीस तीव्र विरोध सुरु केला आहे.

केंद्र, राज्यासह ठाणे महापालिकेच्या सत्तेत एकत्र राहूनही जनतेच्या प्रश्नांसाठी आणि हितासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून ते सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणाऱ्या 'चौकीदाराची' भूमिका पार पाडत असल्याचे दिसत आहे.

शिवसेनेचा महापौर तर भाजपचा उपमहापौर आहे. स्थायी समितीची स्थापना अद्याप करण्यात आलेली नाही. मात्र, भाजपच्या या कार्यपद्धतीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गटनेत्यांच्या बैठकीत प्रस्तावांवर सकारात्मक चर्चा करायची आणि प्रत्यक्षात सभागृहात व बाहेर मात्र लोकांसाठी विरोधी भूमिका मांडायची, हे योग्य नसल्याचे खडेबोल शिवसेनेच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, सभागृह नेते हणमंत जगदाळे आणि सेना सचिव राम रेपाळे यांनी भाजप नगरसेवकांना सुनावले आहेत. तर सभागृहात भाजपच्या नगरसेवकांना बोलून दिले जात नाही, गोंधळात प्रस्ताव मंजूर केले जात असल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांकडून होताना दिसतो.

TMC Budget
Dombivli Marriage Fraud: शारीरिक व्यंग लपवून तरूणाने केले लग्न; ४० तोळे सोने परत न केल्याने सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा

या नाराजी नाट्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या साक्षीने उपमहापौर कृष्णा पाटील यांना प्रेमाचा सल्ला देत गटनेत्यांच्या बैठकीत एकमताने झालेल्या निर्णयावर ठाम राहायचे असते, शब्द फिरवायचे नसते असे जुनी उदाहरणे देऊन स्पष्ट केले.

पूर्वी दिवंगत आनंद दिघे हे निर्णय घेताना आमदार संजय केळकर यांना आनंदाश्रमात बोलावून चर्चा करत, त्यानंतर सभागृहात निर्णय घेत असत, याची आठवण करून देत सरनाईक यांनी सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन महापालिकेतील महत्वाचा निर्णय घेतला तर विरोध होत नाही असे ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सूचित केले.

राष्ट्रवादी काँग्रेसची 'बघ्याची भूमिका'

या संपूर्ण राजकीय नाट्यात सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे विरोधी पक्ष नेते असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची शांतता. लोकशाहीत आणि पालिका कामकाजात सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचे मुख्य काम विरोधी पक्षाचे असते.

परंतु, ठाण्यात शिवसेना आणि भाजप हे मित्रपक्षच एकमेकांसमोर उभे ठाकल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने यात न पडता केवळ परिस्थितीवर लक्ष ठेवत शांत राहणे (वेट अँड वॉच) पसंत केले आहे. विरोधी पक्ष नेते शानू पठाण हे सत्ताधाऱ्यांना मदत करीत त्यांच्या गटनेता, नगरसेवकांना शांत राहण्याची सूचना करीत असल्याचे चित्र महासभेत दिसून आले.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज प्रधान यांना रस्त्यावर उतरून सत्ताधाऱ्यांविधात संघर्षाची भूमिका घ्यावी लागत आहे. दुसरीकडे सत्ताधारी महायुतीतील या अंतर्गत संघर्षाचा राजकीय फायदा कसा घेता येईल, याची रणनीती राष्ट्रवादीकडून आखली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ठाण्यातील ही राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. मित्रपक्षांमधील हा वाढता संघर्ष आगामी काळात कोणते नवे वळण घेणार आणि राष्ट्रवादी यातून काय राजकीय खेळी करणार, याकडे सर्व ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news