

डोंबिवली: पतीला शारीरिक व्यंग समस्या असल्याची माहिती असतानाही ही बाब जाणीवपूर्वक लपवून विवाह केल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत उघडकीस आला आहे. फसवणूक करून लग्न केल्यानंतर पतीने शारीरिक संबंध ठेवण्यास स्पष्ट नकार देत विवाहितेला माहेरी सोडून दिले.
तसेच स्त्रीधन म्हणून दिलेले तब्बल ४० तोळे सोने आणि लग्नासाठी आलेला सुमारे सात लाख रुपयांचा खर्च परत करण्याचे आश्वासन देऊनही ते पूर्ण न केल्याने २८ वर्षीय पिडीत विवाहितेने अखेर विष्णूनगर पोलिस ठाण्यात धाव घेत सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली आहे.
पिडीत विवाहितेने विवाहासाठी जीवनसाथी ॲपवर या वधू-वर सूचक मंडळावर नोंदणी केली होती. त्यानंतर कर्नाटकातील एका तरुणाच्या कुटुंबीयांनी तिच्याशी लग्नाची बोलणी केली. दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीने केरळ येथे थाटामाटात लग्न सोहळा पार पडला.
लग्नानंतर विवाहिता पतीसोबत कर्नाटक येथील सासरी नांदायला गेली. मात्र तेथे गेल्यानंतरच तिच्या आयुष्याला भलतीच कलाटणी मिळाली. या प्रकरणी सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.