

डोंबिवली : शिवसेना आणि भाजपामध्ये पक्ष प्रवेशावरुन सुरू असलेला वादंग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या एकत्रित आल्यानंतर संपुष्टात आला आहे. मात्र आठवडी बाजारावरून दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. त्यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.
परिणामी या निमित्ताने पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राजकीय वादंग सुरू झाला आहे. या वादावर दोन्ही पक्षाचे नेते काय तोडगा काढतात ? याकडे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या नजरा लागल्या आहेत.
कल्याण-डोंबिवलीत भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाकडून एकमेकांच्या पक्षांतील पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांना पक्ष प्रवेश दिला गेला. या पक्ष प्रवेशावरून भाजपा आणि शिंदे गटात राजकीय कुरघोडी सुरू झाली होती. या कुरघोडीची राजकीय चर्चा पार राज्याच्या राजकारणात पोहोचून दिल्लीच्या दरबारीही गेली.
डोंबिवलीतील विकास कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण हे एकाच व्यासपीठावर एकत्रित आले. त्यामुळे या दोन्ही पक्षांतील पक्ष प्रवेशाच्या वादावर पडदा पडला. वास्तविक पाहता हा वाद तिथेच संपुष्टात आला. मात्र कल्याण-डोंबिवलीतील पॅनल क्र. 30 (भोपर) मध्ये आठवडी बाजारावरून भाजपाच्या माजी नगरसेविका रविना माळी आणि शिंदे गटाचे पदाधिकारी अर्जून पाटील यांच्या वादंग सुरू झाला आहे. दोघांनी एकमेकांवर बेछूट आरोप केले आहेत.
आठवडी बाजारात वैयक्तिक स्वार्थ नाही-अर्जुन पाटील
स्वसंरक्षणासाठी माझ्याकडे ही सुरक्षा गेल्या 25 वर्षांपासून आहे. मी कुणाच्या ऑफिससमोर आठवडी बाजार लावला नाही. नागरीकांची मागणी होती, म्हणून हा बाजार लावण्यात आला आहे. त्यात माझा काहीही फायदा नाही. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत भोपर टेकडी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाची गर्दी पाहून विरोधकांच्या पाया खालची वाळू सरकली आहे. निवडणूक जवळ आल्याने हे आरोप केले जात असल्याचा दावा अर्जून पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला.
बंदूकधारी बाऊन्सर्सद्वारे दहशत - रविना माळी
भाजपा कार्यालयाच्या समोर जबदरस्तीने आठवडी बाजार भरविला गेला आहे. अर्जुन पाटील हे बंदूकधारी बाऊन्सर घेऊन दहशत माजवत असल्याचा आरोप भाजपाच्या माजी नगरसेविका रविना माळी यांनी केला आहे. आमच्या आठवडी बाजाराला विरोध नाही, मात्र त्यांनी हा बाजार दुसऱ्या ठिकाणी लावावा. या प्रकरणी पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्याशी भेट घेऊन निवेदन दिले आहे आणि कारवाईची मागणी केल्याचे रविना माळी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.