

ठाणे : ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक महायुतीमध्ये लढून सत्तेत एकत्र बसलेल्या भाजप शिवसेनेत चांगलीच जुंपल्याचे चित्र ठाणे महापालिकेच्या पहिल्याच महासभेत पाहायला मिळाले. प्रश्नोत्तरे तसेच लक्षवेधी घेण्याचा आग्रह भाजपच्या तसेच राष्ट्रावादीच्या नगरसेवकांनी केला. मात्र भाजपच्या नगरसेवकांना डावलत महापौरांनी महापालिका सचिवांना थेट विषयपत्रिका वाचण्याचे आदेश देऊन गोंधळामध्ये विषयांना मंजुरी दिल्याने भाजपचे नगरसेवक सभागृहात चांगलेच आक्रमक झाले.
उपमहापौर कृष्णा पाटील यांनी तर आपले स्थान सोडून खाली येऊन प्रशासनाच्या या कारभाराला तीव्र विरोध केला. तर यापुढे अशाप्रकारचा कारभार खपवून घेणार नाही असा इशारा उपमहापौर कृष्णा पाटील आणि तसेच भाजपच्या नगरसेवकांनी दिला आहे.
शुक्रवारी ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने त्यांना श्रद्धांजली वाहून पूर्ण वेळेसाठी ही सभा तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर ही तहकूब सभा सोमवारी घेण्यात आली. सभा सुरु झाल्यावर सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेते यांची निवड करण्यात आली. त्यानंतर सर्व गट नेत्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी तसेच अर्चना मणेरा यांनी महापौरांना प्रश्नोत्तरे घेण्याची विनंती केली. याचवेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नगरसेवक सुधीर भगत यांनी देखील आपली लक्षवेधी वाचून दाखवावी अशी विनंती केली. मात्र प्रश्नोत्तरे आणि लक्षावधी न घेताच पालिका सचिव मनीष जोशी यांनी थेट विषयपत्रिका वाचायला सुरुवात केली. सचिव विषयपत्रिका वाचत असताना भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, मृणाल पेंडसे, नम्रता कोळी, संजय वाघुले यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र सचिव हे विषय वाचतच राहिले आणि सर्व गोंधळामध्येच पहिली सभा गुंडाळण्यात आली.
आक्रमक नगरसेवकांची प्रशासनाविरोधात घोषणाबाजी
सत्तेचा लाभ घेणाऱ्या भाजप आणि शिंदे गटामध्ये जोरदार खडाजंगी झालेली यावेळी पाहायला मिळाली. महसभा सत्ताधारी शिंदे गट आणि प्रशासनाने फक्त 10 मिनिटात गुंडाळली असल्याने भाजपच्या नगरसेवकांनी थेट व्यासपीठावर जात जाब विचारला. आक्रमक नगरसेवकांनी सभागृहाबाहेर प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. पहिल्याच महासभेत भाजप आणि शिंदे गटामध्ये गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. दरम्यान, ठाणे महापालिकेच्या पहील्याच महासभेला कलंक लागला असल्याची घोषणा भाजपच्या नगरसेवकांनी भर सभेत दिली.
सभागृहात नेमके काय झाले?
विषयपत्रिका नुसार पालिकेची महासभा सुरू करा अशी विनंती करण्यात आली. मात्र भाजप नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत आधी 4 वर्षाचा लेखाजोखा देण्याची मागणी केली. ठाणेकर नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे भाजपच्या नगरसेवकांनी मागितली. तसेच भाजप नगरसेवकांनी मांडलेली लक्षवेधी प्रशासनाने वाचून दाखवावी अशी मागणी केली. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार भूमिका घेत लक्षवेधी वाचून दाखवण्याची विनंती केली. मात्र महापालिकेचे सचिव मनीष जोशी यांनी थेट विषय पत्रिका नुसार कामकाज करण्यास सुरुवात केली. जोशी यांनी झटपट सर्व विषय वाचून दाखवले, या विषयास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर प्रशासनाने महासभा गुंडाळली.