

कोपरखैरणे : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने कारवाई करीत नवी मुंबईतून दोन अल्पवयीन मुलींची सुटका केली. यातील एका मुलीच्या नराधम वडिलांनीच तिला व तिच्या मावस बहिणीला वेश्याव्यवसायात ढकलल्याचे समोर आले आहे. तिच्या वडिलांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांना याबाबत वेळीच खबर मिळाल्याने पुढील अनर्थ टळला आहे. या प्रकरणी एकाला अटक केली असून नराधम बापाचा शोध सुरू आहे. हरिष विकास छारी असे संशयित आरोपीचे नाव आहे. तर दुसरा आरोपी पीडित मुलीचे वडील आहेत.
20 फेब्रुवारी रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना दोन अल्पवयीन मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर त्यांनी बनावट ग्राहकांद्वारे संबंधित व्यक्तीशी संपर्क केला असता तब्बल दीड लाख रुपये सांगण्यात आले.
शिवाय मुली अल्पवयीन असल्याने लॉजवर प्रवेश नसल्याने खासगी ठिकाणी घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला. पोलिसांच्या बनावट ग्राहकाने या व्यवहाराला होकार दिल्याने सीबीडी सेक्टर 11 येथील एका हॉटेल समोर भेटण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे ही माहिती पोलिसांना देण्यात आली.
मुलींना घेऊन जाण्यासाठी म्हणून जेव्हा हरीश आला, त्यावेळी पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्यासोबत आणलेल्या दोन मुलींची सुटका करून त्यांना बाल सुधारगृहात पाठवण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी दिली.