Shahapur heatwave: शहापूरचा पारा 46 अंशांवर; उपाययोजना करण्यासाठी खा.बाळ्यामामा म्हात्रे यांच्याकडे बैठक

वाढते तापमान, सततचे वणवे, बेसुमार वृक्षतोड आणि डोंगर उत्खनन यामुळे शहापूरचा पर्यावरणीय समतोल धोक्यात आल्याची गंभीर चिंता आता व्यक्त होऊ लागली आहे.
Shahapur heatwave
Shahapur heatwavePudhari
Published on
Updated on

शहापूर/डोळखांब : शहापूर तालुका म्हणजे एकेकाळी हिरव्यागार डोंगररांगा, घनदाट जंगल,थंड हवामान आणि नैसर्गिक जलस्रोतांनी समृद्ध असा परिसर. मुंबईच्या जवळ असूनही निसर्गाचे वरदान लाभलेल्या या तालुक्याचा यंदाचा तापमानाचा पारा तब्बल 46 अंशांपर्यंत पोहोचल्याने शहापूरकरांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.

वाढते तापमान, सततचे वणवे, बेसुमार वृक्षतोड आणि डोंगर उत्खनन यामुळे शहापूरचा पर्यावरणीय समतोल धोक्यात आल्याची गंभीर चिंता आता व्यक्त होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण रक्षण मंचने भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांना निवेदन देत तातडीने राज्यस्तरावर व केंद्र स्तरावर हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. यावेळी शंकर खाडे, संतोष शिंदे, नंदकुमार मोगरे, ज्ञानेश्वर तळपाडे, कमल भोईर, किशोर दिनकर, संध्या पाटेकर, प्रमोद पाटोळे आदी पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.

Shahapur heatwave
Thane News: शहापूरातील रत्नमाला इंजिनिअरिंग कॉलेज चौकशीच्या भोवऱ्यात

विकासाच्या नावाखाली निसर्गाची होत असलेली हानी थांबवली नाही तर भविष्यात शहापूर ‌‘अगीची भट्टी‌’ बनण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. मुंबई-आग्रा महामार्गाचे रुंदीकरण, शहापूर-मुरबाड-पाटगाव-खोपोली महामार्गाचे रुंदीकरण, समृद्धी महामार्गाचे बांधकाम आणि विविध पायाभूत प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली.

अनेक दशकांपासून उभे असलेले वड, पिंपळ, उंबर यांसारखे विशाल वृक्ष हटवण्यात आले. पर्यावरणीय नियमांनुसार एका झाडाच्या बदल्यात दहा झाडे लावणे आणि त्यांचे किमान पाच वर्षे संगोपन करणे बंधनकारक असले तरी प्रत्यक्षात केवळ औपचारिकता पार पडल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. पर्यावरण प्रेमींच्या मते झाडांची संख्या कमी झाल्याने परिसरातील नैसर्गिक थंडावा संपुष्टात येत आहे. पूर्वी उन्हाळ्यातही गारवा अनुभवणारा शहापूर आता उष्णतेच्या लाटांनी होरपळत आहे.

Shahapur heatwave
kalyan News: कल्याणमधील उच्चभ्रू परिसरात कारचालकाचे अश्लील कृत्य; महिलांसमोर भररस्त्यात केली लघुशंका

शहापूर तालुक्याला ‌‘विशेष इको-झोन‌’ घोषित करण्याची मागणी

दरम्यान शहापूर तालुक्याला ‌‘विशेष इको-झोन‌’ घोषित करण्याची मागणी केली आहे. यासोबतच महामार्गांच्या दुतर्फा देशी आणि डेरेदार वृक्षांची लागवड, वनवे रोखण्यासाठी आधुनिक यंत्रणा, स्थानिक युवकांना वनरक्षक म्हणून रोजगार आणि डोंगर उत्खननावर कठोर नियंत्रण यांसारख्या उपाययोजना तातडीने राबवण्याची मागणी करण्यात आली आहे.

आजचा पर्यावरणाचा प्रश्न हा केवळ झाडांचा किंवा जंगलांचा विषय राहिलेला नाही. तो पाणी, आरोग्य, शेती आणि भविष्यातील अस्तित्वाशी थेट संबंधित झाला आहे. विकास आवश्यक असला तरी तो निसर्गाचा बळी देऊन होऊ नये अशी भावना शहापूरकर व्यक्त करत आहेत. जर आज कठोर निर्णय घेतले नाहीत तर भविष्यात शहापूरसारखा निसर्गसंपन्न तालुका उष्णतेच्या भीषण संकटात कायमचा अडकू शकतो. त्यामुळे निसर्ग वाचला तरच शहापूर वाचेल हा संदेश आता केवळ घोषवाक्य न राहता कृतीत उतरवण्याची वेळ आल्याची भावना अनेकांनी बोलून दाखवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news