

ठाणे : शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या शहापूर तालुक्याचा ‘पॅटर्न’ आता संपूर्ण ठाणे जिल्हाभर राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमधील शिष्यवृत्तीचा निकाल उंचावण्यासाठी ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
शहापूर हा अतिदुर्गम व आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जात असला, तरी जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांनी नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा अवलंब करत विद्यार्थ्यांना सक्षम मार्गदर्शन केले आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात दिसून येत आहे. मागील वर्षी पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातील 260 गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांपैकी तब्बल 196 विद्यार्थी शहापूर तालुक्यातील होते. जिल्ह्यातील टॉप 10 विद्यार्थ्यांमध्येही सर्व विद्यार्थी शहापूरचेच होते. या उल्लेखनीय यशाची दखल घेत जिल्हाभर हा पॅटर्न राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील मुरबाड, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी आणि शहापूर या तालुक्यांतील जिल्हा परिषदेच्या एकूण 1 हजार 328 शाळांमध्ये हा उपक्रम टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासोबतच शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यावर भर दिला जाणार आहे. खासगी इंग्रजी शाळांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी मराठीसोबत इंग्रजी विषयाचे प्रभावी अध्यापनही करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूरमधील शिक्षक ‘मास्टर ट्रेनर’ म्हणून इतर तालुक्यांतील शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत. चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना नियोजनबद्ध प्रशिक्षण देण्याची कार्यपद्धती जिल्हाभर लागू केली जाणार आहे. या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणार असून, सेस फंडातूनही आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला नवी दिशा देण्याचा प्रशासनाचा मानस आहे.
शहापूर तालुक्यातील शिष्यवृत्ती परीक्षेतील यशामागे नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण शैक्षणिक तयारी ही मुख्य बाब आहे. शाळास्तरावर चौथी व सातवीतील गुणवंत विद्यार्थ्यांची स्वतंत्र निवड केली जाते. त्यानंतर नियमित अध्यापनासोबतच अतिरिक्त मार्गदर्शन वर्गांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांकडून वारंवार सराव परीक्षा घेतल्या जातात व त्यांचे मूल्यमापन करून कमकुवत घटकांवर विशेष भर दिला जातो. शिक्षकांना विषयानुसार प्रशिक्षण देऊन अध्यापन अधिक परिणामकारक केले जाते. तसेच पालकांशी सातत्याने संवाद साधून विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर लक्ष ठेवले जाते. इंग्रजी, विज्ञान आणि गणित विषयावरही विशेष भर दिल्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो. या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामातून शहापूरचा ‘पॅटर्न’ यशस्वी ठरला आहे.
1,328 जिल्हा परिषद शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी
शहापूरमधील शिक्षक ‘मास्टर ट्रेनर’ म्हणून कार्यरत
चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षांवर विशेष लक्ष
अर्थसंकल्प व सेस फंडातून निधी उपलब्ध
ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीवर भर