

ठाणे : दिलीप शिंदे
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या शौर्याचे प्रतीक आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी हे एक नाव नसून समता, प्रेरणा, आस्थेचे केंद्र आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला हिंदवी स्वराज्य देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा मेघडंबरीमधील सिंहासनाधीश पुतळा ठाण्यातील घोडबंदर रोडवरील आनंदनगर येथे उभारण्यात येत आहे. हा पुतळा म्हणजे रायगडवरील मेघडंबरीतील सिंहासनाधीश पुतळ्याची प्रतिकृती असून तो 19 फेब्रुवारीला शिवजयंती दिनी शिवप्रेमींसाठी खुला होईल.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ठाणे नगरीमधील घोडबंदर रोड परिसरात भव्य अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मागणी होत होती. आनंदनगर नाक्यावरील सरकारी भूखंडावरील अतिक्रमणे काढून तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी 2017 मध्ये हा रस्ता आणि भूखंड मोकळा केला. बाधित 200 पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन करून नवीन रस्ता बनविण्यात आला आहे. त्यावेळी संदूरदृष्टीकोन ठेवून ठाणे पालिका अभियंत्यांनी रस्त्यावर भव्य दिव्य चौकाची निर्मिती केली होती. त्या चौकात स्थानिक आमदार तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून आणि प्रशासक तथा आयुक्त सौरभ राव यांच्या मान्यतेने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय झाला.
त्याकरिता नामदार सरनाईक यांनी विशेष निधी उपलब्ध करून दिली असून या पुतळ्याच्या निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. किल्ले रायगडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मेघडंबरीमधील सिंहासनाधीश पुतळ्याप्रमाणे पुण्यातील शिल्पकार सुभाष भरेकर आणि शिल्पकार अमित भरेकर यांनी कात्रज येथील भरेकर आर्ट स्टुडिओमध्ये साडे आठ फुटाचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधीश पुतळ्याची निर्मिती केली आहे.
तसेच रायगड किल्ल्यावरील मेघडंमबरी प्रमाणे 16 बाय 9 इंचाची मेघडंमबरी तयार केली आहे. हा पुतळा फायबरचा (आयओएफआर) असून तो 35 ते 40 वर्ष टिकणारा टिकाऊ आहे. यासाठी चार महिन्याचा कालावधी लागला आहे. किल्ल्याचे चार बुरुज बनविण्यात आले असून त्या बुरुजांवर चार तोफा आणि शस्त्रधारी मावळेही बसविण्यात आले आहेत. 30 मीटरच्या चौथऱ्यावर पुतळा बसविण्याची अंतिम प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु असून येत्या 19 फेब्रुवारीला शिवजयंती दिनी छत्रपतींचा भव्य पुतळा जनतेसाठी खुला केला जाणार आहे.