

शहापूर : राजेश जागरे
जून महिना संपला तरी शहापूर तालुक्यावर वरुणराजाची कृपादृष्टी न झाल्याने भीषण पर्जन्यतूट निर्माण झाली आहे. गतवर्षी जूनअखेर ५३९.६ मिमी पाऊस झालेल्या शहापूरमध्ये यंदा केवळ ७६.६ मिमी पावसाची नोंद झाली असून, तब्बल धरणक्षेत्रात ८६ टक्के पावसाची घसरण झाली आहे. त्यामुळे भात लागवड खोळंबली असून, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्याची स्थितीही चिंताजनक बनली आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार, शहापूरमध्ये यंदाचा जूनमधील पाऊस हा गेल्या वर्षाच्या केवळ १४ टक्के असून, तालुक्याच्या सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत फक्त १८.२ टक्के पाऊस झाला आहे. परिणामी, भात पेरणी, रोपवाटिका आणि खरीप हंगामाची संपूर्ण गणितेच विस्कळीत झाली आहेत. ठाणे जिल्ह्यातही पावसाने मोठी दडी मारली आहे. जिल्ह्यात जूनअखेर केवळ १२६.६ मिमी पावसाची नोंद झाली असून, गतवर्षीच्या ५३९.४ मिमीच्या तुलनेत तब्बल ४१२.८ मिमीची तूट आहे. जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत यंदा केवळ २७.४ टक्के पर्जन्यमान झाले आहे. तालुकानिहाय आकडेवारीही चिंताजनक आहे.
मुरबाडमध्ये ६४६.७ मिमीवरून १६३.५ मिमी, भिवंडीत ५३२.२ वरून १२१.५ मिमी, कल्याणमध्ये ४५३.९ वरून ९७.८ मिमी, उल्हासनगरमध्ये ४८१.८ वरून १२३ मिमी, तर अंबरनाथमध्ये ४६५.३ वरून केवळ ७०.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाअभावी शहापूरसह संपूर्ण परिसरातील शेतकरी चिंतेत आहेत.
अनेकांनी रोपवाटिका तयार केल्या असल्या तरी लागवडीसाठी आवश्यक पाणीच उपलब्ध नसल्याने भात लागवड रखडली आहे. पुढील काही दिवसांत दमदार पाऊस झाला नाही तर उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
धरणसाठाही धोक्याच्या उंबरठ्यावर
अपुर्या पावसाचा फटका धरणांनाही बसला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये केवळ ६.७५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. विशेषतः भातसा, तानसा आणि मोडकसागर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने जलसाठ्यात समाधानकारक वाढ झालेली नाही. आता येत्या काही दिवसांतील मुसळधार पावसावरच धरणसाठा आणि खरीप हंगामाचे भवितव्य अवलंबून असल्याचे चित्र आहे.
जून महिना संपत आला तरी भात लागवडीसाठी आवश्यक पाणी शेतात साचलेले नाही. रोपवाटिका तयार आहेत; मात्र लागवड सुरू करता येत नाही. येत्या काही दिवसांत जोरदार पाऊस झाला नाही तर लागवड उशिरा होऊन उत्पादनावर परिणाम होईल.
शरद शंकर भालके, शेतकरी, नडगाव.