Raigad Water Crisis: पावसाच्या आगमनानंतरही रायगडमध्ये पाणीटंचाईच्या झळा तीव्र; ८५ टँकर्स सुरू; धरणांमध्ये फक्त १७ टक्के पाणीसाठा

४६१ गाव-वाड्यांवरील दीड लाख नागरिकांची पाण्यासाठी वणवण
Raigad Water Crisis
Raigad Water CrisisPudhari
Published on
Updated on

किशोर सुद

अलिबाग: मोसमी पावसाचे आगमन लांबल्याने रायगड जिलह्यातील पाणीसाठ्यांनी तळ गाठला आहे. गेली दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र मोठा पाऊस नसल्याने पाणीसाठ्यांत वाढ झालेली नाही.

जिल्हयातील प्रमुख अठ्ठावीस धरणांमध्ये फक्त १७ टक्के पाणीसाठा शिल्लक असून रायगडवासियांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्हयात ४६१ गाववाड्यांवरील १ लाख ५३ हजार १५७ नागरिकांना ८५ टँकर्सने पाणीपुरवठा सुरु आहे. त्यामुळे रायगडमधील पाणीटंचाई दूर होण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.

रायगड जिल्हयात मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन दरवर्षी तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असते. फेब्रुवारी-मार्चपासून जिल्हयातील पाणी साठे कमी होतात. जलजीवन मिशन सारख्या पाणी पुरवठा योजनाही अपूर्ण आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येते.

पेण, महाड, पोलादपूर, कर्जत आणि मोठा शहरी भाग असलेल्या पनवेलमध्येही पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. तर इतर तालुक्यांमध्येही कमी अधिक प्रमाणात टंचाई सुरु असते. याभागात शासनामार्फत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो.

Raigad Water Crisis
Mumbai Water Crisis: मुंबईतील विहिरींचेही पाणी आटले! एक टँकर भरायला लागतात ५ तास

गेली अनेक वर्षे पाणी पुरवठ्याच्या शेकडो योजना राबवूनही अतिवृष्टीच्या रायगड जिल्हयात उन्हाळ्यात पाणी टंचाई ही दरवर्षीची समस्या आहे. ही पाणीटंचाई दूर होण्यासाठी मोसमी पावसावरच अवलंबून राहावे लागते. २०२५ मध्ये जिल्हयात सुमारे सहा महिने पाऊस झाला. यामुळे जिल्हयात मुबलक पाणीसाठी उपलब्ध राहिल अशी अपेक्षा होती. मात्र नेहमीप्रमाणे जिल्हयात पाणी टंचाईच्या समस्येने डोके वर काढले आहे.

यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे मोसमी पावसाचे वेळापत्रक बिघडल्याचे सांगितले जाते. रायगड जिल्हयात जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणारा पाऊस सुमारे पंधरा दिवस लांबला आहे. पाऊस लांबला असल्याने जिल्हयातील पाणीसाठ्यांवर परिणाम झाला आहे. नदीनाले, विहीरी, तलाव आणि धरणांनी तळ गाठला आहे.

मे महिन्यापासून पाणीटंचाईने उग्र रुप धारण केले होते. त्यात २० जूननंतरही जिल्हयात मोसमी पाऊसाचा जोर वाढला नाही. त्यामुळे रायगडकरांच्या टंचाईचा छळा आणखीनच तीव्र झाल्या. गेल्या वर्षी जिल्ह्यात टंचाईग्रस्त २८५ गाव-वाड्यांवर पाणी पुरवठा करण्यासाठी ४२ टँकर सुरु होते.

१ लाख १३ हजार ७७८ नागरिकांना टंचाईची झळ बसली होती. मात्र यावर्षी त्यात मोठी भर पडली आहे. सर्वाधिक टंचाईग्रस्त गावे पेण, महाड, कर्जत तालुक्यात आहेत. एकूण ४६१ गाव-वाड्यांना खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे.

Raigad Water Crisis
BEST Electric AC Bus: मुंबईकरांच्या सेवेत १५०० एसी मिडी बस; भाडेतत्‍वावर बस घेण्‍यास बेस्ट समितीची मंजुरी

रायगड जिल्ह्याच्या पाटबंधारे विभागाच्या अखरत्यारीत येणाऱ्या २८ धरण प्रकल्पांमध्ये पाणीसाठा कमी झाला आहे. मुरुड तालुक्यातील फणसाड तर महाड तालुक्यातील कोथुर्डे या दोन धरण्यातील उपयुक्त साठा पूर्णपणे संपला आहे.

तर सात धरणांमध्ये १० टक्केपेक्षा कमी पाणीसाठा आहे. नऊ धरणांमध्ये २५ टक्क्यांपर्यंत पाणी असून उर्व दहा धरणांमध्ये २५ ते ५० टक्क्यांपर्यंत पाणी साठा आहे. त्यामुळे पाणी टंचाई दूर होण्यासाठी जोरदार पावसाठी आवश्यक आहे. अन्यथा आगामी काळात आणखी तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असून प्रशासनानेही पाणीसाठ्याबाबत आतापासून नियोजन सुरू केले आहे.

महाड तालुक्यात सर्वाधिक टंचाईग्रस्त गावे

महाड तालुक्याला पाणी टंचाईच्या सर्वाधिक झळा बसत आहेत. तालुक्यात २९ गावे आणि १३८ वाड्यांवर १३ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. अलिबाग तालुक्यात ३, उरण १, पनवेल १०, कर्जत १७, खालापूर ६, पेण १२, सुधागड २, रोहा १, माणगाव ५, पोलादपूर ४, म्हसळा ७, श्रीवर्धन २, मुरुड १, तळा १ असे जिल्ह्यात एकूण ८५ टँकर्स सुरू आहेत.

फणसाड, कोथुर्डे धरणे कोरडी

रायगड पाठबंधारे विभागाअंतर्गत येणाऱ्या २८ धरणांपैकी मुरुड तालुक्यातील फणसाड आणि महाड तालुक्यातील कोथुर्डे धरण्यात शून्य टक्के पाणी साठा आहे. या सर्व २८ धरणांमध्ये फक्त १७.६० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी या धरणांमध्ये ५२ टक्के पाणीसाठा शिल्ला होता. यावरून यावर्षीच्या पाणीसाठ्याची भीषणता लक्षात येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news