

Farmer Financial Crisis
शहापूर : तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. कारण, त्यांनी शासनाच्या अधिकृत खरेदी केंद्रावर धान्यविक्री करून दोन ते तीन महिने उलटले असतानाही त्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत.
यावर्षी शासनाने धान्याला हमीभाव देत बोनसचीही घोषणा केली होती, त्यामुळे बाजारपेठेच्या तुलनेत अधिक दर मिळेल या अपेक्षेने अनेक शेतकर्यांनी शासकीय खरेदी केंद्रावर आपले भात पोहोचवले. परंतु या खरेदी प्रक्रियेनंतरही तब्बल 1 हजार 500 शेतकर्यांना ना मूळ विक्री रक्कम मिळाली आहे, ना बोनस परिणामी बियाणे, खते, मशागत यांसाठी लागणारा खर्च करणे शेतकर्यांना अशक्य होत चालले आहे.
मे महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस आणि मान्सूनचे आगमन झाल्यामुळे खरिपाच्या हंगामाची तयारी सुरू झाली आहे. मात्र, खात्रीशीर उत्पन्नाच्या अभावी आणि थकीत रक्कम न मिळाल्यामुळे शेतकर्यांची अवस्था अडचणीत आणणारी झाली आहे. ट्रॅक्टर भाड्याने घेणे, बियाणे खरेदी करणे, खते मिळवणे यासाठी पैशांची नितांत गरज आहे. पण बँकांच्या दारात फेर्या मारूनही पैसे मिळत नसल्यामुळे शेतकर्यांची चिंता वाढली आहे. यावर्षी शासनाने दोन हेक्टरपर्यंतच्या शेतकर्यांसाठी हेक्टरी 20 हजार रुपयांचा बोनस जाहीर केला आहे.
हमीभाव 2 हजार 300 रुपये प्रतिक्विंटल निश्चित करण्यात आला असून बाजार भावाच्या तुलनेत हा पर्याय नक्कीच चांगला वाटतो. पण जेव्हा मूळ विक्री रक्कमच शेतकर्यांना वेळेत मिळत नाही, तेव्हा बोनस फक्त कागदावरच उरतो, अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. शासनाकडून बोनस जाहीर करण्यात आला. परंतु प्रत्यक्षात त्याचा लाभ शेतकर्यांच्या हाती केव्हा पडणार, याचा काही अंदाज नसल्याचे अॅॅड. प्रशांत घोडविंदे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले.
लवकरात लवकर शेतकर्यांच्या खात्यात थकीत रक्कम जमा करावी आणि बोनसही वितरित करावा. अन्यथा खरिपाची तयारी करणे कठीण होईल आणि शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर जाईल. यावर्षी हवामान बदलामुळे आधीच पीक नुकसान झाले आहे, त्यात शासन वेळेवर पैसे देत नसेल, तर शेतकर्यांचा शासनावरचा विश्वास पूर्णपणे ढासळेल. त्यामुळे शासनाने आणि संबंधित यंत्रणांनी याची गंभीर दखल घेऊन त्वरित कारवाई करणे अत्यावश्यक आहे.
भगवान सांबरे, भात उत्पादक शेतकरी.