Dombivli Snakebite Case | सर्पदंश मृत्यूकांड प्रकरण : डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रूग्णालयातील पाच जणांवर ठपका; कर्तव्यात कसूर ठेवल्याचा निष्कर्ष

केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची कारवाई
Dombivli snakebite death case
Dombivli snakebite death casePudhari
Published on
Updated on

Dombivli snakebite death case

डोंबिवली : सर्पदंश झालेल्या दोन्ही मुलींचा कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रूग्णालयात दुर्दैवाने मृत्यू झाला होता. सप्टेंबर महिन्यात घडलेल्या या मृत्युकांडाची तांत्रिक चौकशी सुरू होती. चौकशी दरम्यान विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय जाधव यांना कर्तव्यात कसूर केल्याचा निष्कर्ष काढून यापूर्वीच निलंबित केले आहे. केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी दिलेल्या आदेशांनुसार स्थापन केलेल्या चौकशी समितीने रूग्णालयातील पाच जणांवर ठपका ठेवला आहे.

यातील दोन कर्मचारी निलंबित करण्यात आले असून एका कर्मचाऱ्याला कामावर येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. बालकांचा अतिदक्षता विभाग चालविणाऱ्या बाह्यस्त्रोत संस्थेला ५० टक्के रक्कम कपात करण्याचा दंड ठोठावण्यात आला आहे. रूग्णालयाचे पर्यवेक्षीय काम प्रभावीपणे पार न पाडल्याबद्दल रूग्णालय प्रमुखांची एक वेतनवाढ रोखण्यात आली आहे.

Dombivli snakebite death case
Dombivli Student Assault | डोंबिवलीत पूर्ववैमनस्यातून विद्यार्थ्याला अमानुष मारहाण

निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय जाधव, परिचारिका प्रमुख शारदा गोडसे, कक्ष कामगार आशीष कांबळे (करोना काळातील कामगार) यांचा समावेश आहे. शास्त्रीनगर रूग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश चौधरी यांनी पर्यवेक्षीय काम प्रभावीपणे पार न पाडल्याबद्दल त्यांची एक वेतनवाढ रोखण्यात आली आहे.

रूग्णालयातील बालकांच्या अतिदक्षता विभागाचे काम पाहणाऱ्या बाह्यस्त्रोत अल्पाईन डायग्नॉसिस संस्थेने यावेळी हलगर्जीपणा केल्याने त्यांच्या ऑक्टोबरच्या देयकातील ५० टक्के रक्कम दंड म्हणून कपात करावी, असे चौकशी समितीने म्हटले आहे. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी रूग्णालयात कर्तव्य असतानाही डॉ. संजय जाधव परवानगीशिवाय रात्रपाळीत गैरहजर होते. तसेच परिचारिका प्रमुख शारदा गोडसे, कक्ष कामगार आशिष कांबळे आपत्कालीन कक्षात उपस्थित नव्हते.

Dombivli snakebite death case
Kalyan-Dombivli water crisis : पाण्यासाठी महिलांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा

काय घडले त्या दिवशी ?

रविवारी २८ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास डोंबिवली जवळच्या खंबाळपाड्यातील ठाकूर कुटुंबीयांकडे पाहुणी म्हणून मुक्कामी राहिलेल्या ४ वर्षीय प्राणवी भोईर आणि तिची २३ वर्षीय मावशी बबली उर्फ श्रुती ठाकूर या दोघींना गाढ झोपेत असताना मण्यार जातीच्या सापाने दंश केला. या दोघींना उपचाराकरिता केडीएमसीच्या शास्त्रीनगर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राणवी भोईर हिचा त्याचदिवशी, तर श्रुती ठाकूर हिचा ३० सप्टेंबर रोजी ठाण्यातील सिव्हील रूग्णालयामध्ये मृत्यू झाला. दोघींच्या मृत्यूला शास्त्रीनगर रूग्णालय प्रशासन कारणीभूत ठरल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता.

नातेवाईक/राजकारण्यांच्या आंदोलनाचे पडसाद

त्यादिवशी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी बालिकेला अल्पाईन डायग्नाॅसिसच्या बाल अतिदक्षता विभागात दाखल केले. श्रृतीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला ठाण्याच्या सिव्हील रूग्णालय येथे पाठविण्यात आले. प्राणवी हिची तब्येत नंतर चिंताजनक झाल्याने तिलाही सिव्हील रूग्णालयाकडे पाठविण्यात आले. उपचार सुरू असताना प्राणवीचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ श्रृतीनेही दम तोडला. दोघा निरागस मुलींच्या मृत्यूस शास्त्रीनगर रूग्णालयातील डाॅक्टर आणि कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करत कुटुंबीयांसह राजकीय नेत्यांनी रूग्णालयासमोर आंंदोलन करून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाीची मागणी केली होती.

Dombivli snakebite death case
Dombivli Voter List : डोंबिवलीतील मतदार याद्यांचा घोळ अद्याप कायम

डोंबिवलीचे आमदार तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, दीपेश म्हात्रे, सत्यवान म्हात्रे, ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि राजसैनिकांनी घडलेल्या मृत्यूकांडाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आयुक्त अभिनव गोयल यांनी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त प्रसाद बोरकर, उपायुक्त वंदना गुळवे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. दीपा शुक्ल यांची चौकशी समिती गठीत केली होती.

वतनदार कर्मचाऱ्यांवर आयुक्तांची करडी नजर

वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या शास्त्रीनगर रूग्णालयात आता नव्याने मुख्य वैद्यकीय अधिकारी नेमण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. साधना पिंजारी यांना नियुक्त करण्याऐवजी अनुभवी डॉ. सुहासिनी बडेकर यांना नियुक्त करण्याची मागणी राजकीय मंडळींकडून करण्यात येत आहे. रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून आरोग्य विभागातील ढिसाळ आणि बेशिस्त कारभारावर आजही सडकून टिका करण्यात येत आहे. आयुक्त अभिनव गोयल यांनी आतापर्यंत एकूण १२ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. अद्याप या रूग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या दोन वतनदार कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news