

डोंबिवली : पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून पश्चिम डोंबिवलीतील फुलेनगर ठाकुरवाडी परिसरात राहणाऱ्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याला अमानुष मारहाण करण्यात आली. हा हल्ला कोपर पुलाजवळील सिध्दार्थनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या तिघा तरूणांनी स्टम्प, पेव्हर ब्लॉकच्या साह्याने करून या विद्यार्थ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या विद्यार्थ्याला वाचविण्यासाठी मधे पडलेल्या मित्राला देखिल त्रिकुटाने बेदम मारहाण केली आहे. मंगळवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून विष्णूनगर पोलिसांनी फरार हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.
हल्ल्यात जबर जखमी झालेला विद्यार्थी पश्चिमेतील ठाकुरवाडी फुलेनगरमध्ये आपल्या कुटुंबीयांसह राहतो. हा विद्यार्थी त्याच परिसरात असलेल्या एका शाळेत शिक्षण घेत आहे. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी सदर विद्यार्थ्याच्या जबानीवरून कोपर रेल्वे उड्डाण पुलाजवळ असलेल्या सिध्दार्थनगर झोपडपट्टीतील कुणाल कुशाळकर (१९), अविनाश वाकोडे (२०) आणि किशोर पवार (२१) या तिघा हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी रात्री बारा वाजताच्या दरम्यान डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील पंडित दिनदयाळ चौकात हा प्रकार घडला आहे. हल्ल्यातसाठी क्रिकेटचे स्टम्प आणि पेव्हर ब्लाॅक वापरण्यात आले आहेत.
या प्रकरणी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार मंगळवारी रात्री हा विद्यार्थी पंडित दिनदयाळ चौकातून पायी घरी जात होता. इतक्यात ओळखीचे असलेले सिध्दार्थनगर झोपडपट्टीतील कुणाल कुशाळकर आणि किशोर पवार हे भेटले. त्यांनी जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून आक्रमक होत विद्यार्थ्याला मारहाण सुरू केली. मी आता तुम्हाला काही केले नाही...तुम्ही मला का मारहाण करता ? असा प्रश्न विद्यार्थ्याने विचारताच हल्लेखोरांनी जुन्या भांडणाचे दाखले देत आता तुला सोडणार नाही असे बोलत क्रिकेटच्या स्टम्पचे फटके तोंडावर मारले. चंदन सरदार याने रस्त्यावर पडलेला पेव्हर ब्लाॅकचा ठोकळा उचलून हातावर आणि पाठीवर मारून गंभीर दुखापत केली. अविनाश वाकोडे आणि चंदन सरदार या दोघांनी लाथा-थुबक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला.
दरम्यान मारहाण सुरू असताना विद्यार्थ्याचा मित्र आर्या गायकवाड हा बचावासाठी पुढे आला. त्यावेळी या तिघांनी मिळून भांडण सोडविण्यासाठी मधे पडलेल्या आर्या गायकवाड यालाही बेदम मारहाण केली. हाताच्या पंजावर पेव्हर ब्लाॅक मारून आर्यालाही दुखापत केली. हल्लेखोरांची दहशतीचे वातावरण केले होते. हे पाहून पं. दिनदयाळ चौकातील प्रवासी आणि रिक्षावाल्यांनी तेथून पळ काढला. त्यामुळे विद्यार्थी आणि त्याचा मित्र एकाकी पडले. अल्पवयीन मुलांना होत असलेली मारहाण पाहून कुणीही पादचारी, रहिवासी आणि रिक्षावाला या हाणामारीचा साक्षीदार नको म्हणून मुलांच्या बचावासाठी पुढे आला नाही. उलट बघ्यांनी देखिल तेथून पळ काढल्याने पंडित दिनदयाळ चौक काही क्षणांत निर्मनुष्य झाला होता. हल्लेखोर अद्याप हाती लागले नसून पोलिस त्यांचा कसोशीने शोध घेत आहेत.