

योगेश गोडे
सापाड: सापाड गावची स्वयंभू आई गावदेवी मातेची पारंपरिक जत्रा उत्सव मोठया उत्साहात सुरू झाली असून यात्रे निमित्ताने गावदेवी मंदिराला हजारों दिव्यांची रोषणाईने सजवण्यात आले आहे. आई गावदेवी यात्रा उत्सवा निमित्ताने पारंपरिक पालखी सोहळा आणि विविध धार्मिक आणि सांकृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून यात्रा उत्सव सापाड गावात साजरा केला जातो.
कल्याण पश्चिम सापाड गावातील आई गावदेवी मंदिरची स्थापना इसवीसन 1969 मध्ये करण्यात आली आहे. चैत्र महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात पारंपरिक यात्रा सुरू होतात, त्या प्रमाणे आई गावदेवीची यात्रा एकादशी निमित्त पालखी सोहळा काढून करण्यात येत असते. पालखी सोहळ्याची सुरुवात गावदेवी मंदिरापासून करण्यात येते.
तर संपूर्ण गावातून पालखी सोहळा फिरवण्यात येत असतो. गुलालाची लाली उधळत, आई गावदेवीच्या गाण्यावर ठेका धरत भक्तगण पालखी सोहळ्यात बेधुंद होऊन नाचत होते. यात्रे निमित्त पंचक्रोशीतील ग्रामस्थ भेदभाव विसरून एकत्रितपणे आई गावदेवी जत्रा उत्सवात सहभागी होत असतात. आणि आई गावदेवी मातेचा उत्सव आनंदात साजरा करत असतात, भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी सापाड गावची गावदेवी माता म्हणून ख्याती असणाऱ्या गावदेवीच्या दर्शनासाठी भक्तांची प्रत्येक वर्षी अलोट गर्दी होत असते.
यात्रे निमित्ताने आई गावदेवी मातेला श्रीफळ, पुष्पहार व वेणीची ओटी भरली जाते. पारंपरिक पध्दती नुसार एक तळाव व भातशेतीचा लिलाव केला जातो, त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून गावदेवी मातेचा उत्सव प्रत्येक वर्षी आंनदात साजरा केला जातो, चैत्र महिना सुरू झाला की महाराष्ट्राभर देवींचा पारंपरिक जत्रा उत्सव सुरू होतो.
कार्ल्याच्या डोंगरावर वास्तव्य करणारी आई एकवीरा देवी असो वा गावागावांनमधील भक्ताच्या संकटाला धावून जाणारी स्वयंभू माता गावदेवी असो. भक्तजन मोठ्या भक्तिभावाने देवीचा जत्रा उत्सव साजरा करत असतात. सापाड गावातील आई गावदेवी ही भक्ताच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी स्वयंभू माता म्हणून ओळखली जाते.
आई गावदेवी मातेचा यात्रा उत्सव भाविकांच्या श्रद्धेतून साजरा होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या जत्रा उत्सवात भाविकांच्या करमणुकीसाठी आकाशी पाळणे, चकरी घोडे, खाऊची दुकाने, लहानग्यासाठी खेंळणीचे साहित्य, जादूचे खेळ दाखवणारी दुकाने, मौत का कुआ, दैनंदिन वापराच्या वस्तू आणि खेळण्याच्या साहित्यांनी गजबजून गेलेल्या सापाड गावातील आई गावदेवी मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आलं आहे.