

मिरा रोड : काशीमीरा येथे अवैध गौण खनिज (वाळू) वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गेलेले नायब तहसीलदार आणि त्यांच्या पथकावर वाळू माफियांनी हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सरकारी कामात अडथळा आणून नायब तहसीलदारांना धक्काबुक्की व मारहाण करत आरोपींनी वाळूचा हायवा पळवून नेला. याप्रकरणी काशिगाव पोलीस ठाण्यात 7 अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरा-भाईंदर अप्पर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार प्रथमेश भुर्के (32) हे 24 डिसेंबर रोजी पहाटे 2 च्या सुमारास त्यांच्या पथकासह मुंबई - अहमदाबाद हायवेवर हॉटेल फाउंटन जवळ गस्तीवर होते. यावेळी वाळूने भरलेला एक हायवा मुंबईच्या दिशेने येताना दिसला. नायब तहसीलदारांनी इशारा करूनही हायवा चालक थांबला नाही. पथकाने मोटारसायकलवरून पाठलाग करून काशीमीरा येथील हॉटेल पाली व्हिलेजसमोर हायवा अडवला.
चालकाने गाडी थांबवल्यावर मोबाईलवरून मालकाला बोलावून घेतले. काही वेळातच दोन कारमधून 5 इसम घटनास्थळी दाखल झाले. या व्यक्तींनी नायब तहसीलदार भुर्के व त्यांच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की व मारहाण केली.
या गोंधळाचा फायदा घेत हायवा चालक वाहन घेऊन दहिसरच्या दिशेने पळून गेला. त्यानंतर कारमधील पाचही आरोपी पळून गेले. वाळू माफियांनी महसूल अधिकाऱ्यावर केलेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे अधिकाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
या गंभीर प्रकारानंतर नायब तहसीलदार प्रथमेश भुर्के यांनी काशिगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी 7 अनोळखी व्यक्तींविरुद्ध सरकारी कामात अडथळा, मारहाण आणि दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. वाळू माफियांनी महसूल अधिकाऱ्यावर केलेल्या हल्ल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.