

जोगेश्वरी : अंधेरी पश्चिम भागातील वीरा देसाई रोडवर कंट्री क्लबजवळच्या 23 मजली सोरोंटो टॉवर या निवासी इमारतीला गुरुवारी सकाळी आग लागल्याने तातडीने धाव घेत मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी 40 रहिवाशांचे प्राण वाचवले.
सोरेंटो अपार्टमेंटच्या 12 व्या, 13 व्या आणि 14 व्या मजल्यांवर ही आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाने इमारतीच्या 16 व्या मजल्यावर अडकलेल्या 30 ते 40 जणांना सुरक्षितपणे खाली आणले. 15 व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये अडकलेल्या एका महिलेसह तिघांना ब्रीदिंग ॲपॅरेटसचा (श्वसन यंत्रणा) वापर करून सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
इमारतीच्या 10 व्या ते 21 व्या मजल्यादरम्यानच्या इलेक्ट्रिकल डक्टमधील वायरिंग, राऊटर्स, जोड्यांचे रॅक आणि लाकडी फर्निचरला या आगीची झळ बसली. अग्निशमन दलाच्या किमान चार गाड्या आणि इतर यंत्रणांच्या सहाय्याने सकाळी 11.37 वाजता आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
चित्रपट निर्माते संदीप सिंह यांचे घर 14 व्या मजल्यावर आहे. संदीप सिंघ नुकतेच हर्नियावर उपचार घेऊन कोकिलाबेन रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर घरी परतले होते. ते सुदैवाने बचावले. संदीप सिंघ हे मेरी कोम, सरबजीत, अलिगढ, झुंड, स्वातंत्र वीर सावरकर, सफेद आणि छत्रपती शिवाजी महाराजसारख्या अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांचे निर्माते आणि दिग्दर्शक आहेत.