

मुंबई ः राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी नोंदणी करताना उमेदवारांना आधार प्रमाणीकरण आणि अपार आयडी सक्तीचा करण्यात आल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने दिली आहे.
शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून एमएचटी-सीईटी ही प्रवेश परीक्षा वर्षातून दोनवेळा आयोजित केली जाणार आहे. या बदलामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यासाठी अधिक संधी उपलब्ध होईल. यासह सीईटी सेलमार्फत सुमारे 35 पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा घेतल्या जाणार आहेत. सीईटी परीक्षांची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. यापूर्वी आधार आणि ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाऊंट रजिस्ट्री अर्थात अपार आयडी अनिवार्य केला आहे.
विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षांच्या अर्ज भरताना कागदपत्रांच्या अडचणी येऊ नयेत म्हणून, सीईटी सेलमार्फत आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यात आली आहे. अर्जासाठी उमेदवारांकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. तसेच, आधारकार्डवरील माहिती जसे की, नाव, दहावीच्या प्रमाणपत्राप्रमाणे जन्मतारीख, नवीनतम छायाचित्र, पत्ता, वडिलांचे नाव आणि आधारशी जोडलेला मोबाइल नंबर चालू असणे आवश्यक आहे.
आधार व्यतिरिक्त उमेदवारांना त्यांचा अपार आयडी तयार करावा लागणार आहे. अपार आयडी सीईटी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी अनिवार्य असेल, दिव्यांग उमेदवारांसाठी, सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले दिव्यांग प्रमाणपत्र किंवा युडीआयडी दिव्यांग आयडी कार्ड अपलोड करणे अनिवार्य आहे. त्यामुळे दिव्यांग उमेदवारांना हे कार्ड मिळवावे लागणार आहे, असे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.