

ठाणे : 22 व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला शुक्रवारी मुंबईतील पु. ल. देशपांडे कला अकादमीत प्रारंभ झाला. या महोत्सवात महोत्सवात सुप्रसिद्ध दिग्दर्शिका पद्मभुषण सई परांजपे यांना आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्काराने राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव व आशियाई चित्रपट फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण व्ही. शांताराम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
पु.ल. देशपांडे अकादमीच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्यास राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे प्रकाश मगदूम, प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्रभात चित्र मंडळाचे संतोष पाठारे, चैतन्य शांताराम, संदीप मांजरेकर आदि मान्यवर उपस्थित होते. हा चित्रपट महोत्सव येत्या 18 जानेवारी पर्यंत पु. ल. देशपांडे कला अकादमी आणि ठाण्यातील लेकसिटी (विवियाना) मॉल येथे सुरू राहणार आहे.
यावेळी पुरस्काराला उत्तर देतांना सई परांजपे यांनी आकाशवाणी, दुरदर्शन, फिल्म इन्सिट्यूट, नाटक, चित्रपटनिर्मिती क्षेत्रात केलेल्या कामाच्या आठवणी सांगितल्या. आपला देश हा सतत काही न काही घडणारा, औसुक्यपूर्ण असा देश आहे, त्यामुळे येथे निर्मितीसाठी आपण डोळे उघडे ठेवून अवलोकन केले तर आपल्याला बॉलीवूड किंवा पाश्चिमात्य चित्रपटांचे अनुकरण करण्याची गरज नाही, असे मत सई परांजपेयांनी व्यक्त केले.
करमणूकीवर माझा विश्वास आहे, करमणूकीच्या माध्यमातून आपला संदेश सहजतेने प्रेक्षकांपर्यंत पोहचवता येतो, पण आपल्याकडे चित्रपट, नाटक ही माध्यमे संदेशप्रधान किंवा नैतिकता देणारी समजली जातात. विनोद हे करमणूकीचे अविभाज्य अंग आहे, माझ्या निर्मितीमधून मी रोजच्या मानवी संबंधातून विनोदाची निर्मिती करण्याच प्रयत्न करण्याचा दाखला त्यांनी दिला.
आशियाई चित्रपट फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण व्ही. शांताराम यांनी माझे वडील व्ही. शांताराम यांचे 125 जन्मशताब्दी वर्ष सुरू असल्याने पुढील वर्षापासून या महोत्सवात त्यांच्या नावाने पुरस्कार देण्याची घोषणा केली. माझ्या वडीलांच्या कारकीर्दीवर चित्रपटाची निर्मिती केली जात असून येत्या 18 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल, अशीही माहिती त्यांनी दिली. संदीप मांजरेकर यांनी आभार मानले.