

उल्हासनगर / कल्याणः केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आगामी उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाई या पक्षांच्या महायुतीने एकत्र येऊन लढा द्यावा, अशी महत्त्वपूर्ण विनंती केली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र उमेदवार उभे केले होते, परंतु उल्हासनगरमध्ये मात्र महायुती व्हावी, असा आग्रह आठवले यांनी धरला आहे.
रविवारी रात्री उल्हासनगर येथील गोल मैदान या ठिकाणी रिपाईचे शहर अध्यक्ष नाना बागुल यांनी पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी रामदास आठवले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी ही सूचना केली ते पुढे म्हणाले की रिपाई पक्षाला आगामी महानगरपालिका निवडणुकीत किमान १५ जागा मिळाव्यात अशी मागणी केली. तसेच, महायुती एकत्रितपणे निवडणूक लढल्यास उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये निश्चितपणे महायुतीचा महापौर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आठवले यांनी उल्हासनगर शहराच्या सामाजिक भूमिकेवर प्रकाश टाकला. उल्हासनगर हे एकेकाळी दलित चळवळीचे मोठे केंद्र होते आणि येथे ठिकठिकाणी छावण्या उभारण्यात आल्या होत्या, अशी आठवण त्यांनी करून दिली. तथापि, आता रिपाई पक्ष सर्व समाजाच्या लोकांना सोबत घेऊन चालतो. या शहरात सिंधी, मुस्लिम, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय तसेच विविध समाजाचे लोक राहतात, असे ते म्हणाले. या संदर्भात बोलताना त्यांनी रिपाई पक्षाने विधानसभा निवडणुकीत सिंधी समाजाचे पप्पू कलानी यांना तिकीट देऊन त्यांना आमदार म्हणून निवडून आणले होते, या वस्तुस्थितीवर बोट ठेवले. राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य करतानाच आठवले यांनी कोकणच्या जगप्रसिद्ध हापूस आंब्याच्या दर्जाचा मुद्दाही उपस्थित केला. सध्या बलसाडमध्ये पिकलेल्या आंब्यालाही हापूस आंब्याचे नाव देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यावर त्यांनी कोकणचा हापूस आंबा हा नंबर एकचा असेल आणि त्याला मिळालेला एक नंबरचा दर्जा कलंकित होता कामा नये, असे स्पष्ट मत व्यक्त केले.
रामदास आठवले यांनी काँग्रेस पक्षाकडून वारंवार केल्या जाणाऱ्या संविधान धोक्यात आहे या प्रचारावरही टीका केली. "हा काँग्रेसचा अपप्रचार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान आजही मजबूत आणि सुरक्षित आहे," असे ठामपणे आठवले म्हणाले. काही ठिकाणी दलित समाजावर अत्याचाराच्या घटना घडत असल्याच्या घटना मान्य करत, अशा अत्याचारांविरुद्ध आपला पक्ष नेहमी लढा देत असतो, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. यावेळी रिपाई नेते नाना बागुल, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार कुमार आयलानी, शिवसेना महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, महेश गायकवाड, अरुण आशान, भाजप शहराध्यक्ष राजेश वधारिया, रिपाई नेते शांताराम निकम, नाना पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान आगामी केडीएमसीच्या पालिका निवडणुकीत महायुती पक्षातील घटक पक्ष असलेला आरपीआय पक्षाला २० जागा मिळाव्यात अशी मागणी महायुती पक्षाकडे कडे करणार असल्याचे आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कल्याण मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या जाहीर मेळाव्यात केली. कल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी महायुती, जागावाटप आणि स्थानिक राजकीय समीकरणांवर महत्वपूर्ण भूमिका मांडली. या वेळी रामदास आठवले सांगितले की, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका ही मुंबई महानगर प्रदेशातील महत्वाची पालिका आहे. महायुतीनेच ही निवडणूक लढवावी, ही आर पी आय ची ठाम भूमिका आहे. भाजपा शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिन्ही पक्षात जागावाटपा बाबत किती एकमत झाले आहे याची माहिती नाही. मात्र आमचा पक्ष भाजपचा जिवाभावाचा मित्र आहे. भाजपाने आपल्या कोट्यातून आरपीआयला 20 जागा द्याव्यात, अशी आमची मागणी आहे.