

नाशिक : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून महायुतीला ४० जागांची अपेक्षा होती. मात्र, चुकीचा प्रचार करण्यास विरोधक यशस्वी ठरल्याने, महायुतीच्या जागा घटल्या. मात्र, मतांची टक्केवारी लक्षात घेता विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या १७० जागा येतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे पुढील मुख्यमंत्री महायुतीचाच होणार आहे. 'भाजप आणि मनसेत अंडरस्टॅण्डिंग असून, मुख्यमंत्री महायुतीचा होणार' या राज ठाकरेंच्या मताशी मी सहमत आहे. आमच्यात मुख्यमंत्रिपदावरून वाद नसल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. तसेच वाद झाल्यास मी मुख्यमंत्री पदासाठी तयार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
जेलरोड, भीमनगर येथील दलित पँथरचे कार्यकर्ते शंकराव काकळीज यांच्या शोकसभेसाठी नाशिक येथे सोमवारी (दि. ४) आलेले मंत्री आठवले माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्या निवडणूक न लढविण्याच्या भूमिकेचे स्वागत केले. माजी खासदार राजू शेट्टी, युवराज संभाजीराजे यांच्या आघाडीचा महायुतीला फायदा होणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. विधानसभा निवडणुकीत रिपाइं कार्यकर्त्यांनी महायुतीच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन करताना रिपाइंच्या मतांचा महायुतीला फायदा होत असल्याचे ते म्हणाले. हरियाणातील विजयामुळे आमचा आत्मविश्वास वाढला असून, राज्यात १७० जागा महायुतीला मिळतील, असाही दावा मंत्री आठवले यांनी केला. यावेळी आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, प्रशांत जाधव, प्रकाश लोंढे आदी उपस्थित होते.
महायुतीत आम्ही चार जागांची मागणी केली होती. मात्र, एकच जागा दिली गेली. परंतु महामंडळे, विधान परिषदेवर आम्हाला संधी दिली जाईल. केंद्रात मंत्रिपद मिळाल्याने, पक्षाचा देशपातळीवर विस्तार झाल्याचे मंत्री आठवले यांनी स्पष्ट केले. मनसे महायुतीत नसली तरी, मनसेच्या उमेदवारांचा तसेच तिसऱ्या आघाडीचाही महायुतीला फायदा होणार आहे. अशात नवीन मित्र आलेत म्हणून भाजपने आम्हाला मागे टाकू नये, असा इशाराही केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी दिला.
जरांगे फॅक्टर चालणार नाही. मराठा समाजाच्या मागे सरकार उभे आहे. सर्व मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण देणे शक्य नाही. कोणाला ओबीसी म्हणयाचे हा अधिकार केंद्राला असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. जरांगेंची भूमिका योग्य असून, त्यांना आता राजकारण कळू लागले आहे. काही वेळा दोन पावले मागे यावे लागते, असेही मंत्री आठवले म्हणाले.