

ठाणे : राबोडीच्या साकेत मैदान परिसरात खारफुटी क्षेत्रात सुरू असलेल्या भरावाला राष्ट्रीय हरित लवादाचा ब्रेक लावला आहे. पुढील आदेश येईपर्यंत काम थांबवण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाच्या खंडपीठाने पोलीस आयुक्तांना दिले आहेत. तसेच नोटीस बजावूनही सुनावणीला प्रतिनिधी पाठवला नसल्याने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांवरही लवादाने नाराजी व्यक्त केली आहे. पुढील सुनावणीपर्यंत उत्तर दाखल न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः हजर राहावे लागेल, अशी तंबी देखील देण्यात आली आहे.
साकेत मैदान परिसरात खारफुटी कत्तल करून मोठ्या प्रमाणावर भराव टाकण्याचे काम सुरु आहे. याप्रकरणी पर्यावरण कार्यकर्ते रोहित जोशी आणि आकाशगंगा सोसायटी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली.
राबोडीतील परिसरात या कथित बेकायदा भराव आणि बांधकाम होत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. आता या भरावप्रकरणीची राष्ट्रीय हरित लवादाने गंभीर दखल घेतली आहे. साकेत मैदानावर ठाणे पोलीस विभागाच्या मियावाकी प्रकल्पासाठी सुमारे नऊ हजार झाडे लावण्याचे नियोजन असल्याने माती व खताचा भराव करण्यात येत असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
मात्र, वन विभागाच्या पत्रानुसार ही जागा खारफुटीपासून ५० मीटरच्या बफर क्षेत्रात असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे क्षेत्र सीआरझेडच्या कक्षेत येत असल्याचे निरीक्षण राष्ट्रीय हरित लवादाने नोंदवले आहे. दरम्यान, अंतिम निर्णय होईपर्यंत भरावावर बंदी कायम ठेवण्यात आली आहे.
खारफुटीची कत्तल आणि भरावाबाबत निरीक्षण नोंदविण्यात आले असून महापालिकेने राबोडी पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र दिल्याचेही याचिकेत नमूद आहे. मात्र, ही जागा पोलीस विभागाच्या ताब्यात असल्याने कारवाईची जबाबदारी पोलिसांकडे आहे.
दरम्यान, पोलिसांच्या कारवाईची दिशा काय असेल? असा सवाल याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
१६ नोव्हेंबरला पुढील सुनावणी
खारफुटीच्या जागेवरच भराव टाकण्यात आल्याने हे प्रकरण आता महत्त्वाचे ठरले आहे. दरम्यान, १६ नोव्हेंबर मध्ये पुढील सुनावणी होणार असून सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.