

मुंबई : कुर्ल्यात घरच्या घरी प्रसूती झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असलेल्या महिलेला उपचारासाठी चक्क चादरीतून रुग्णालयात नेण्याची वेळ कुटुंबीय शेजाऱ्यांवर आली. प्रसूतीनंतरही नाळ कापलेली नव्हती आणि अपरा बाहेर पडलेला नव्हता, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. महिलेची प्रकृती बिघडत असताना तातडीने वैद्यकीय मदत मिळाली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. अखेर शेजाऱ्यांनी पुढाकार घेत महिलेला चादरीत गुंडाळून डॉ. आनंदीबाई जोशी प्रसूतिगृहात नेले.
ही घटना बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास कुर्ला पश्चिमेतील बैलबाजार परिसरात घडली. कुटुंबीय व स्थानिक नागरिकांनी या घटनेचे व्हिडिओ चित्रित केले. त्यात अरुंद व दाटीवाटीच्या गल्ल्यांमधून महिलेला चादरीतून रुग्णालयाकडे नेत असल्याचे दिसून येते.
कुटुंबीयांच्या माहितीनुसार, अंजली पवार ही महिला प्रसूतीसाठी आपल्या आईच्या घरी आली होती. तिची प्रसूती पुढील महिन्यात अपेक्षित होती. मात्र, बुधवारी पहाटे घरातच तिची प्रसूती झाली. यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला.
परिस्थिती गंभीर असल्याने कुटुंबीयांनी जवळच्या प्रसूतिगृहाशी संपर्क साधून घराजवळ वैद्यकीय मदत पाठवण्याची विनंती केली. मात्र, त्यांच्या आरोपानुसार, डॉक्टर मदतीसाठी आले नाहीत. मुख्य परिचारिकाही उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णवाहिका किंवा तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध न झाल्याने अखेर शेजाऱ्यांनी महिलेला चादरीत गुंडाळून रुग्णालयापर्यंत नेले. मदतीसाठी कुटुंबीयांनी जवळच्या पोलीस ठाण्यातही धाव घेतल्याचे सांगितले.
या घटनेचे प्रत्यक्षदर्शी व परिसरातील २६ वर्षीय मयांक सोलंकी यांनी सांगितले की, संबंधित महिला त्यांच्या शेजारी राहते. प्रसूतीसाठी ती आईच्या घरी आली होती. प्रसूतीच्या वेळी घरात अन्य कोणीही नव्हते.
दरम्यान, रुग्णालयात पोहोचल्यानंतरही सुरुवातीला महिलेला उपचार मिळण्यात अडचणी आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर तसेच घटनेचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी उपचार सुरू केल्याचा दावा त्यांनी केला.