Mumbai Ganeshotsav 2026 : श्रीमंत बाप्पाच्या सेवेत पाटकर परिवाराची ७२ वर्षांची तपश्चर्या!

तीन पिढ्यांनी जपली मूर्तिसेवेची भक्ती; चौथ्या पिढीतील लेकीच्या हाती परंपरेचा वारसा
Mumbai Ganeshotsav 2026
माटुंगा येथील जीएसबी मंडळाची मुर्ती.pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : मिलिंद कारेकर

सोन्याने मढलेला, कोट्यवधींच्या विमा कवचाने संरक्षित आणि देशातील सर्वाधिक श्रीमंत गणपतींपैकी एक म्हणून ओळखला जाणारा माटुंग्याचा जीएसबी गणपती. या वैभवशाली बाप्पाच्या भव्य रूपामागे मात्र गेल्या ७२ वर्षांची एका मराठमोळ्या परिवाराची निःस्वार्थ भक्ती दडली आहे. गिरगावातील पाटकर परिवाराच्या तीन पिढ्यांनी श्रींची मूर्ती घडवण्याची ही सेवा अखंडपणे सुरू ठेवली आहे. आता या भक्तीच्या वारशात पुढच्या पिढीतील गौतमी पाटकर हिचीही भर पडली आहे.

जीएसबी गणपतीच्या मूर्तिसेवेची सुरुवात मूर्तिकार नारायण पाटकर यांच्यापासून झाली. त्यांचे बंधू गणेश पाटकर यांचीही या सेवेत मोलाची साथ होती. त्यानंतर गेल्या ३५ वर्षांपासून अविनाश पाटकर मनोभावे श्रींची मूर्ती साकारत आहेत. आता त्यांची कन्या गौतमीही वडिलांच्या या भक्तीच्या वाटेवर पाऊल ठेवत आहे. विशेषतः कागदी लगद्यापासून मूर्ती साकारण्यात तिचा हातखंडा आहे. २२ फूट उंच मूर्ती साकारताना मनुष्यबळाची मोठी गरज भासते. मात्र अडचणी कितीही आल्या तरी ‘बाप्पाच आपले काम पूर्ण करून घेतो’, असा अविनाश पाटकर यांचा दृढ विश्वास आहे.

Mumbai Ganeshotsav 2026
Mumbai Coastal Road : मुंबईच्या कोस्टल रोडवरील बोगदा बनला ‘रेस ट्रॅक’; आलिशान गाड्यांचा थरारक व्हिडीओ व्हायरल

पाटकर कुटुंब हे गेल्या १०० वर्षांहून अधिक काळापासून गिरगावमध्ये 'पाटकर आर्ट्स'च्या माध्यमातून मूर्ती बनवण्याचे काम करत आहे. मात्र माटुंग्याच्या जीएसबी गणपतीच्या मूर्तिचे काम पहिल्या वर्षापासून त्यांच्या मंडपातच जावून करण्यात येते. यासाठी एक महिन्याचा कालावधी जातो.

कागदी लगद्यापासून साकारली मूर्ती

यंदा अविनाश पाटकर यांच्याकडे तब्बल ६४ गणपतींच्या मूर्तींचे काम आहे. त्यात जीएसबीचा बाप्पा सर्वात महत्त्वाचा. याशिवाय गिरगावातील खोताची वाडी येथील १००व्या वर्षानिमित्त गौतमी पाटकर हिने कागदी लगद्यापासून साकारलेली मूर्ती विशेष आकर्षण ठरत आहे. वाशीतील जीएसबी मंडळ आणि कुर्ल्यातील बालाजी मंदिरातील जीएसबी गणपतीची मूर्तीही पाटकर परिवाराकडून साकारली जात आहे.

डेरवण येथील शिवसृष्टीच्या निर्मितीतही पाटकर परिवाराने योगदान दिले आहे. त्यामुळे केवळ एक मूर्तीकार कुटुंब म्हणून नव्हे, तर मुंबईच्या गणेशोत्सवाच्या परंपरेला तीन पिढ्यांपासून आकार देणारा भक्तीचा परिवार म्हणून पाटकर कुटुंबाची ओळख निर्माण झाली आहे.

Mumbai Ganeshotsav 2026
Wadgaon Maval Sports Complex: वडगाव मावळच्या क्रीडासंकुलासाठी पोटोबा देवस्थानची जागा द्या; राजकारण न करण्याचे आवाहन

तीन पिढ्यांची श्रद्धा

७२ वर्षे उलटली, पिढ्या बदलल्या, काळ बदलला; मात्र पाटकर परिवाराची बाप्पाच्या चरणी असलेली सेवा आजही तितकीच अखंड आहे. त्यांच्या हातातून घडणाऱ्या प्रत्येक मूर्तीत केवळ माती, कागद किंवा आकार नसतो; असते ती तीन पिढ्यांची श्रद्धा आणि बाप्पाच्या सेवेत वाहिलेल्या आयुष्याची कहाणी.

रुग्णालयातून परतले अन् बाप्पा साकारला!

पाटकर यांच्या भक्तीची प्रचिती देणारा प्रसंग गेल्या वर्षी घडला. २०२५ मध्ये जीएसबी गणपतीचे काम सुरू असताना अविनाश पाटकर आजारी पडले. प्रकृती गंभीर झाल्याने यंदाचा बाप्पा पूर्ण होईल की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र गणेशोत्सवाला अवघे १५ दिवस बाकी असताना ते रुग्णालयातून घरी परतले आणि त्यानंतर अवघ्या १५ दिवसांत त्यांनी श्रींची मूर्ती पूर्ण करून दाखवली. ‘ही माझी ताकद नव्हे, बाप्पाचीच कृपा होती,’ अशी भावना पाटकर व्यक्त करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news