Central Railway Enforcement : मध्य रेल्वेतील दिव्यांगांच्या डब्यांमध्ये सर्वसामान्यांची घुसखोरी
मुरबाड शहर : किशोर गायकवाड
मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावरील दिव्यांगांसाठी आरक्षित रेल्वे डब्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सामान्य महिला व पुरुषांची घुसखोरी होत असल्याचा गंभीर आरोप दिव्यांग रेल्वे प्रवाशांकडून केला जात असून यामुळे दिव्यांग प्रवाशांना सुरक्षितपणे चढणे-उतरणे अशक्य होत असल्याची तक्रार वारंवार समोर येत आहे.
एका रेल्वे अपघातात दिव्यांग प्रवासी सचिन निवृत्ती गरुड यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या समस्येबाबत त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालयातील दिव्यांग कल्याण विभाग तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने पत्रव्यवहार केला आहे. मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत फारसा बदल झालेला दिसून येत नसल्याचा आरोप केला जात आहे.
याबाबत ऑक्टोबर महिन्यात दिव्यांग कल्याण विभागाचे कार्यासन अधिकारी सा. द. मुकदाडवार यांनी मुंबई मंडळ रेल्वे प्रबंधकांना पत्र पाठवून, दिव्यांगांच्या आरक्षित डब्यांमधील घुसखोरी रोखण्याबाबत 21 दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र या पत्रानंतरही यथायोग्य कारवाई झालेली नाही, अशी चर्चा प्रवासी वर्गात सुरू आहे.
ही बाब केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नसून, मध्य रेल्वेतील हजारो दिव्यांग या डब्यातून प्रवास करतात. दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही दिव्यांग प्रवाशांकडून दिला जात आहे.
पोलिसांच्या नियुक्तीची मागणी
आरक्षित डब्यांमध्ये रोज सकाळ-संध्याकाळ गर्दीच्या वेळेत सामान्य प्रवाशांची दादागिरी आणि बेकायदेशीर प्रवेश मोठ्या प्रमाणावर दिसून असल्याचा दिव्यांग प्रवाशांचा आरोप आहे. त्यामुळे दिव्यांग प्रवाशांना अक्षरशः डब्यात चढणे किंवा उतरणेही कठीण होत आहे. काही वेळा अपघाताचा धोका निर्माण होत असल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. मात्र अर्जदाराच्या तक्रारीनुसार घुसखोरीवर तत्काळ दंडनीय कारवाई सुरू केली, तर बेकायदेशीर प्रवासालाही आळा बसेल, असे त्यांनी सांगितले. मात्र सकाळी व संध्याकाळी किमान 50 लोकल गाड्यांमध्ये आरपीएफची किंवा अन्य पोलिसी बळाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा दिव्यांग प्रवाशांना न्याय मिळणार नाही, असा सूर व्यक्त केला जात आहे.

