Pratap Sarnaik Mira Bhayander Morcha | मीरा भाईंदरमधील मराठी मोर्चा कोणी हायजॅक केला?; प्रताप सरनाईकांचा 'मनसे', 'उबाठा'वर निशाणा
Pratap Sarnaik Mira Bhayander Morcha
मिरा-भाईंदर शहरात मंगळवारी मराठी भाषेच्या सन्मानासाठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सहभागी होण्यासाठी गेलेल्या आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात 'गो बॅक'ची नारेबाजी करण्यात आली. त्यांच्या दिशेने पाण्याची बाटलीही फेकण्यात आली. यामुळे सरनाईक यांनी मोर्चातून काढता पाय घ्यावा लागला. या पार्श्वभूमीवर प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
''मराठी एकीकीकरण समितीने मोर्चाचे आयोजन केले होते. पण त्यांना बाजूला सारुन मनसे आणि उबाठाच्या लोकांनी मोर्चा हायजॅक केला,'' असा आरोप सरनाईक यांनी केला आहे. हा मोर्चा शांतताप्रिय मार्गाने होऊ द्यायचा होता. मिरा- भाईंदर शांतताप्रिय शहर आहे. हिंदू- मुस्लिम वाद जेव्हा होतो, त्यावेळी मीरा भाईंदरला जाऊन काहीतरी वाच्यता करायची. मराठी- अमराठी वाद जेव्हा निर्माण होतो तेव्हा मराठी लोकांनी वेगळं बोलायचं, बाहेरच्या लोकांनी वेगळं बोलायचं. एका शांतताप्रिय शहराला प्रयोगशाळा करण्याचे काम विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनी केले आहे, अशा शब्दांत सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मीरा भाईंदरमध्ये मराठीच्या आवाजासाठी उभारलेल्या आंदोलनात मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांच्यासह सहभागी झालो. मी मंत्री, आमदार नंतर... मराठी आधी आहे. मीरा भाईंदरमधील मराठी माणसाच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा असेन, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
नेमकं काय घडलं?
मिरा-भाईंदरमधील एका व्यापाऱ्याने मराठीत बोलण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर वादाला तोंड फुटले. यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या व्यापाऱ्याला समज दिली. या निषेधार्थ अमराठी व्यापाऱ्यांनी शहरातून मोर्चा काढला. त्याला प्रत्युत्तर म्हणून मराठी एकीकरण समिती आणि विविध मराठी संघटनांनी मोर्चाचे आयोजन केले. पण त्याला पोलिसांनी परवानगी नाकारली. तसेच मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केली. यामुळे संतप्त भावना व्यक्त करत मनसे कार्यकर्ते मराठी भाषेच्या सन्मानासाठी रस्त्यावर उतरले.

