Thane Politics News: मंत्री प्रताप सरनाईक विरुद्ध नरेंद्र मेहता यांच्यातील वाद उफाळला

सरनाईक जमिनी हडप करत असल्याचा आरोप करत थेट मंत्र्याविरुध्द दिली पोलीस ठाण्यात तक्रार
Pratap Sarnaik controversy
Pratap Sarnaik controversyPudhari
Published on
Updated on

ठाणे: राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपचे मिरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. भाईंदर पाडा येथील भूमिपुत्रांची जमीन गुंडाच्या माध्यमातून हडपण्याचा प्रयत्न मंत्री सरनाईक यांनी केला असल्याचा गंभीर आरोप मेहता यांनी केला आहे.

यासंदर्भात त्यांनी सरनाईक यांच्या विरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यानंतर त्यांनी थेट ठाणे महापालिका मुख्यालय गाठत संबंधितांना ठाणे पालिकेकडून कोणत्या परवानग्या दिल्या आहेत याची विचारणा केली.

Pratap Sarnaik controversy
Dog Feeding Spots: भटक्या श्वानांच्या नियंत्रणासाठी 'डॉग फीडिंग स्पॉट'

सरनाईक हे भूमिपुत्रांच्या जमिनी जबरदस्तीने लाटत असून अशा कामांमुळे ते सरकारची प्रतिमा मालिन करत आहेत. त्यामुळे भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार असल्याचे मेहता यांनी स्पष्ट केले आहे. मेहता आणि सरनाईक यांच्यातील वादामुळे महायुतीमध्येही संघर्षाची ठणगी पडली आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि मिरा-भाईंदर मधील भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यातील वाद जुनाच असून पालिका निवडणुकीमध्येही हा वाद चांगलाच रंगला होता. आता या वादाला हवा मिळाली आहे ती भाईंदर पाडा येथील भूमिपुत्रांच्या जमिनीचा ताबा घेण्यावरून.

भाईंदर पाडा येथील भोईर कुटुंबीयांची जमीन गुंडाचा वापर करून सरनाईक हे जबरदस्तीने बळकावत असल्याचा गंभीर आरोप मेहता यांनी केला आहे. या भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी मेहता यांनी सरनाईक यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

मिरा-भाईंदर येथील भाजपच्या सर्व नगरसेवकांना एकत्र करून मेहता सुरुवातीला ज्या ठिकाणी जमीन बळकावण्याचा प्रकार घडला त्या ठिकाणी गेले. त्यानंतर त्यांनी थेट कासारवडवली पोलीस ठाण्यात जाऊन सरनाईक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.

मेहता एवढ्यावर थांबले नाहीत तर त्यांनी थेट ठाणे महापालिका मुख्यालय गाठत संबंधित जागेचा ताबा घेताना पालिकेची झाडे तोडण्याची परवानगी होती का? किंवा ठाणे महापालकेने संबंधीत विकासकाला अन्य परवानग्या दिल्या आहेत का? याचा जाब पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांना विचारला.

भोईर यांची जमीन हडपणे हे एक प्रकरण असून सरनाईक हे भूमिपुत्रांच्या जमीन लाटत असल्याने ते सरकारची प्रतिमा मालिन करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे यासंदर्भात मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांची लवकरच भेट घेऊन भूमिपुत्रांना न्याय देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लाठी काठ्यांनी आमची डोकी फोडली

जागा ताब्यात घेण्यासाठी आलेल्या 100 ते 150 अनोळखी माणसांनी आमच्यावर थेट हल्ला केला. यामध्ये लाठी काठयांनी आमची डोकी देखील फोडली असल्याचा आरोप भोईर कुटुंबीयांनी केला आहे. यामध्ये आमच्या कुटुंबातील चार व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती भोईर कुटुंबीयांनी दिली आहे.

प्रताप सरनाईक हे शिंदेच्या शिवसेनेमधून ओवळा माजिवडा मतदार संघातून निवडणून आले आहेत. ते सध्या मंत्रिमंडळात परिवहन मंत्री आहेत. तर एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत. तर नरेंद्र मेहता हे भाजपचे मिरा-भाईंदर मतदार संघाचे आमदार असून त्यांचे पक्षात चांगले वजन आहे.

Pratap Sarnaik controversy
Dombivli power cut: डोंबिवलीच्या निवासी विभागात बत्तीगुलचे रडगाणे सुरूच

सरनाईक आणि मेहता वाद हा जुनाच आहे. पालिका निवडणुकीतही शिंदेच्या शिवसेनेने आणि भाजपने मिरा-भाईंदरमध्ये एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यात असताना त्यांच्याच पक्षातील मंत्रांच्या विरोधात मेहता हे तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले. एकमेकांना नामोहरम करण्याची एकही संधी सरनाईक आणि मेहता सोडत नसून त्यांच्यातील हा वाद आता महायुतीची तापदायक ठरला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर काय मार्ग काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

भाईंदर पाडा येथील जगनाथ गंगाधर भोईर यांनी कासारवडवली पोलीस स्टेशनला दिलेल्या जबाबानुसार, त्यांचे वडील गंगाधर भोईर आणि त्यांचे काका तसेच त्यांची मुले अशी मिळून त्यांच्या मालकीची भाईंदर पाडा या ठिकाणी सर्वे क्रमांक- 109/19 अ असा 24.39 गुंठे असा प्लॉट आहे. त्यापैकी 12.19 गुंठे जमिनीत त्यांचे वडील सोडून इतर व्यक्तींनी 2013 साली बालाजी एंटरप्रायजेस यांच्याशी करार होऊन ती जमीन विकासासाठी देण्यात आली आहे.

उर्वरित 12.19 गुंठ्याच्या प्लॉटचा ताबा हा गंगाधर भोईर यांच्याकडेच होता. जून 2025 मध्ये प्रताप रसनाईक यांच्या कार्यालायात सदर जागेसंबंधी प्रताप सरनाईक यांनी गंगाधर भोईर यांच्या हिस्स्याची 12 गुंठे जागा ही त्यांनाच देण्यात येईल असे सांगितले होते. मात्र शनिवारी रात्री 12 च्या सुमारास त्यांची जमीन अचानकपणे ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. अंदाजे 80 ते 100 अनोळखी पुरुष आणि महिलांचा वापर करून ताबा घेण्यात आला.

भोईर कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी आमचे काहीच ऐकले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर रविवारी दुपारी 2 च्या सुमारास पुन्हा अंदाजे 80 ते 100 अनोळखी पुरुष आणि महिलांनी जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयन्त केला. यावेळी लाठी काठ्यांनी तुफान हाणामारी झाली. यामध्ये गंगाधर भोईर, निर्मला भोईर आणि इतर नातेवाईकांना गंभीर जखमी करण्यात आले. त्यानंतर या वादात आता नरेंद्र मेहता यांनी उडी घेतली आहे.

भोईर कुटुंबीयांनी 50 टक्के जागा विकली नसताना त्यांची जमीन जबरदस्तीने हडप केली जात आहे. परवा रात्री 12 च्या सुमारास वाजता, राहते घर तोडले, जुनी झाडे तोडली, जमीन हाडपण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी 324 चे कलम लावले एवढा जीवघेणा हल्ला होऊनही 307 कलम का लावले नाही. अशा व्यक्तींपासून शेतकऱ्यांना, भूमिपुत्रांना संरक्षण दिले पाहिजे. ज्या अधिकाऱ्यांनी प्लॅन पास केला, त्यांना निलंबित केले पाहिजे. सरनाईक जमीन हडपत असून नेहमीच भमीपुत्रांना टार्गेट करत आहेत. सरकारची अब्रू वेशीवर टांगण्याचे काम सरनाईक करत आहेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना लवकरच भेटणार.

- नरेंद्र मेहता, आमदार भाजप मेहता यांनी उडी घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news