

ठाणे: शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची हत्येसाठी पाच कोटींचा आर्थिक व्यवहार झाला असून त्यापैकी अडीच कोटी रोकड देण्यात आली असा खळबळजनक आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी करून मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची नार्कोटेस्ट, पवार नगर बैठकीची चौकशी, हॉटेल महाराजाचे सीसीटीव्ही फुटेज जप्त करून सीडीआर, आर्थिक व्यवहार तपासणे तसेच सीबीआय चौकशीची मागणी केली.
प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी नितेश पवार आणि निखिल यादव यांना न्यायालयाने ८ ऑक्टोबरपर्यंत सात दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. तर आज शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ठाण्यात पुर्णेकर कुटुंबीयांची भेट घेतली.
त्यावेळी अंधारे म्हणाल्या की, "प्रदीप पुर्णेकर यांच्या कुटुंबीयांसोबत आमच्या संपूर्ण पक्षाच्या संवेदना आहेत. हा आघात म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कधीही न भरून निघणारे मोठे नुकसान आहे.
पक्षातील प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिक पुर्णेकर कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक झाली असली, तरी मुख्य संशयित असणाऱ्या मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना अद्याप अटक का झाली नाही ?" असा सवाल त्यांनी केला. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन अंधारे यांनी शिंदे दाम्पत्ये आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
खुनाच्या कलम ३०२ च्या गुन्ह्यात संशयीत म्हणून नाव असलेली व्यक्ती उजळ माथ्याने पत्रकार परिषद घेते, तरीही पोलीस दात नसलेल्या वाघासारखे लाचार का बसले आहेत? मीनाक्षी शिंदे यांना आपल्या दोन्ही मुलींना परदेशात का पाठवावे लागले ? या सगळ्यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड्स काढले पाहिजेत, अशी आक्रमक भूमिका अंधारे यांनी घेऊन भाजपचे मंत्री नितेश राणे यांना बालिश मेंदूचे संबोधून पूर्णेकर हत्याप्रकरणी भूमिका घेण्याचे आव्हान दिले.
अंधारे म्हणाल्या, जबाबात मीनाक्षी शिंदे यांचे नाव स्पष्टपणे आले आहे. क्लस्टर योजनेत गोरगरीब माणसाला हक्काचे घर मिळावे, यासाठी प्रदीप पुर्णेकर सातत्याने लढत होते. त्यांनी मीनाक्षी शिंदे यांच्या जात प्रमाणपत्रावरही आक्षेप घेतला होता. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, या संपूर्ण कटात तब्बल ५ कोटी रुपयांचा मोठा आर्थिक व्यवहार झाला आहे. गेल्या १५ दिवसांपासून पूर्णेकरांची रेकी सुरू होती.
पवार नगर परिसरात मीनाक्षी शिंदे, राजा शिंदे आणि टल्ली यांची गुप्त भेट झाली होती. पोलिसांनी पवार नगर बैठकीची चौकशी करावी आणि तातडीने हॉटेल महाराजाचे सीसीटीव्ही फुटेज जप्त करावे.
नार्को टेस्ट करा, सीडीआर तपासा "जर ती ऑडिओ क्लिप 'एआय' जनरेटेड होती, तर त्यांनी ८ महिन्यांपूर्वी सायबर पोलिसांकडे तक्रार का केली नाही? या प्रकरणातील सत्य समोर आणण्यासाठी मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची नार्को टेस्ट झालीच पाहिजे," अशी मागणी अंधारे यांनी करून दिशा सालियन प्रकरणी आम्ही दहा चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगितले.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सुनेबाबत गलिच्छ बोलणाऱ्याची जीप हासडली पाहिजे? असे म्हणत शिंदे दाम्पत्य आणि पकडलेल्या आरोपींच्या आर्थिक व्यवहाराची चौकशीची मागणी केली. तसेच एसआयटी चौकशीतून काही निष्पन्न होण्याची शक्यता नाही, कारण एफआयआर मध्ये पोलिसांनी नाव घेण्यास टाळाटाळ केली, काही वरिष्ठ पोलीस अधिकारी अनेक वर्षांपासून ठाण्यात ठाण मांडून आहेत, ते कुणाच्या आशीर्वादाने असे प्रश्न उपस्थित करून सीबीआय चौकशी व्हायला हवी अशी अंधारे यांनी आक्रमक भूमिका घेतली.