

राजू काळे
भाईंदर: भाईंदर पश्चिमेकडील घाऊक मासळी. बाजारात गेल्या ५० ते ६० वर्षांपासून पिढ्यानपिढ्या स्थानिक मासळी व्यापारी व्यवसाय करीत असताना आता येथील गाळ्यांवर बाहेरील व्यक्तींचे अतिक्रमण झाल्याचे दिसून आले आहे. त्यातही एकाच कुटुंबातील अनेकांच्या नावे या गाळ्यांचे वितरण करण्यात आल्याने स्थानिक मासळी व्यापाऱ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप होऊ लागला आहे.
भाईंदर येथील स्थानिक मच्छिमारांना हक्काची बाजारपेठ नसल्याने भाईंदर पश्चिमेकडील खाडी मार्गावर (जय अंबे नगर) गेल्या ५० ते ६० वर्षांपासून स्थानिक मासळी व्यापारी घाऊक मासळी विक्रीचा व्यवसाय करीत आहेत.
मात्र बदलत्या काळानुसार या बाजारातील गाळ्यांचे वितरण शहराबाहेरील मासळी विक्रेत्यांच्या हाती जाऊन त्यांचे अतिक्रमण त्या गाळ्यांवर झाल्याचे निदर्शनास आले आहे. स्थानिक मच्छिमारांना त्यांची मासळी स्थानिकांनाच विकता यावीत, यासाठी सुरु केलेला मासळी बाजार पहाटे ३ ते ७ या वेळेत भरविला जातो.
पूर्वी घाऊक मासळी व्यापाऱ्यांना पालिकेकडून १२ ते १५ वर्षांसाठी गाळे वितरीत करण्यात आले होते. या गाळ्यांचे भुईभाडे अनेक व्यापारी नियमितपणे पालिकेचा भरीत होते. पालिकेने २०२२ मध्ये जुन्या गाळेधारकांचे गाळे रद्द करून सुमारे ३५ नवीन गाळे मासळी कापणाऱ्या तसेच किरकोळ ग्राहकांना मासळी विकणाऱ्या व्यक्तींना वितरित करण्यात आले.
जुन्या गाळ्यांचे वितरण शहरातील १४ ते १५ ग्रामस्थ वा मासळी व्यापाऱ्यांना वितरित करण्यात आले होते. मात्र गाळ्यांची संख्या वाढताच बाहेरील मासळी विक्रेत्यांनी या गाळ्यांवर अतिक्रमण करण्यास सुरुवात केली.
या गाळ्यांच्या वितरणादरम्यान गाळे वितरणात पिढ्यानपिढ्या घाऊक मासळीचा व्यवसाय करणाऱ्या स्थानिक व्यापाऱ्यांचे गाळे रद्द करण्यात आले. त्यांना एकूण ३५ नवीन गाळयांपैकी केवळ ७ ते ८ गाळ्यांचे वितरण करण्यात आल्याचे दिसून आले आहे. तर बाहेरील व्यक्तींच्या एकाच कुटुंबातील २ ते ७ जणांना वितरित करण्यात आले. यामुळे पालिकेच्या एका कुटुंबाला एकच गाळा या संकल्पनेला हरताळ फासला गेला.
विशेष म्हणजे ज्या बाहेरील व्यक्तींना तसेच स्थानिक किरकोळ मासळी विक्रेते व मासळी कापणाऱ्यांना गाळे वितरीत करण्यात आले ते अद्यापही त्या गाळ्यातून व्यवसाय न करता ते पुन्हा रस्त्यावर व्यवसाय करून घाऊक मासळी विक्रेत्यांच्या व्यवसायात अडचण निर्माण करू लागल्याचा आरोप घाऊक मासळी व्यापाऱ्यांकडून होऊ लागला आहे.
मात्र अद्याप कारवाई केली नसल्याचे सांगण्यात आले. गाळेधारक गाळ्यात केवळ विविध वस्तूंचा साठा करून ठेवत असल्याचे निदर्शनास येत आहे. नियमित कर भरलेला नव्हता अशांनाही नवीन गाळ्यांचे वितरण केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोणत्या कागदपत्रांच्या आधारे नवीन गाळ्यांचे वितरण केलेे, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
घाऊक मासळी व्यापाऱ्यांत संभ्रम...
जुन्या गाळेधारकांवर एक निकष लागू करून त्यांचे गाळे रद्द केले असताना नवीन गाळे वितरणात वेगळा निकष का लावण्यात आला, यावर घाऊक मासळी व्यापाऱ्यांनी संभ्रम व्यक्त केला आहे. नवीन गाळे वितरणात २०२०-२१ मध्ये एका व्यक्तीचे नाव नवीन गाळेधारकांच्या यादीत टाकण्यात आले असून ते कोणत्या आधारे टाकण्यात आले, यावर देखील व्यापाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे.
२०२२ मध्ये वितरीत करण्यात आलेल्या गाळ्यांची तीन वर्षांची मुदत २०२५ मध्ये संपली असताना त्यांचे नवीकरण अथवा नव्याने धोरण निश्चित करण्यात आलेले नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा घाऊक मासळी बाजार असताना घाऊक मासळी व्यापाऱ्यांचे गाळे रद्द करून मासळी कापणाऱ्या व किरकोळ मासळी विक्रेत्यांना शहरात १०० वर्षांचे वास्तव्य असलेल्या घाऊक मासळी व्यापाऱ्याचा गाळा रद्द करून वितरीत करण्यात आले. हा निर्णय कोणत्या उद्देशाने किंवा कोणत्या निकषांवर घेण्यात आला, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.