

डोंबिवली शहर : गुलाबी थंडी चढताच शरीराचे चोचले पुरवण्यासाठी खवय्ये नवनवीन ‘फंडे’ आजमावू लागतात. थंडीची चाहूल लागताच, पोपटीचा तोंडाला पाणी सुटेल असा घमघमाट दरवळू लागतो. हा सुगंध नाकात शिरताच खवय्ये अक्षरशः फुलून जाताना दिसतात. हिवाळ्यातील हंगामी खाद्यसंस्कृतीचा हा रंगतदार सोहळा सध्या जोमात सुरू आहे. शेकोटीवर मातीच्या मडक्यात भाजली जाणारी ही पारंपरिक पोपटी खवय्यांची पहिली पसंती ठरत आहे.
थंडीत शेतघरांत, मोकळ्या जागी, फार्महाऊसमध्ये आणि आता तर शहरी टेरेस पार्ट्यांतही पोपटीची धामधूम सुरू झाली आहे. कुटुंबीय व मित्रमंडळी शेकोटीभोवती बसून हशा गप्पांमध्ये रात्री रंगवत असताना पानझडीचा मंद सुगंध आणि पोपटीचा सुगंधी दरवळ वातावरणाला अजूनच मोहक बनवतो. पोपटीसाठी वाल, पावटे, तुरीच्या शेंगा, बटाटे, वांगी, गोड रताळी, कांदे अशा भाज्या तिखट मसालेदार वाटणात मुरवून मातीच्या मडक्यात भरल्या जातात. मांसाहारी पर्यायासाठी चिकन किंवा मटण मसाल्यात मुरवून केळीच्या पानात गुंडाळून मडक्यात ठेवले जाते. मडक्याच्या तळाशी भांबुर्डा या विशिष्ट सुगंधाच्या वनस्पतीची पाने अंथरली जातात, ज्यामुळे पोपटीला वेगळा नैसर्गिक सुवास प्राप्त होतो.
मडक्याचे तोंड घट्ट झाकून ते शेकोटीत अर्धा ते पाऊण तास पुरले जाते. तेलपाण्याविना, फक्त आगीच्या उष्णतेवर शिजणारी ही पाककृती अतिशय हलकी, सुगंधी आणि चवदार असते. मडक्यावर पाणी घातल्यावर ‘चर्र’ असा आवाज झाला की पोपटी तयार झाल्याचे संकेत मिळतात. त्यानंतर ती मोठ्या परातीत काढल्यावर भाजलेल्या भाज्यांचा मोहक सुगंध पाहुण्यांना अक्षरशः जेवणासाठी बोलावतो. तरुणांमध्ये पोपटी पार्ट्यांचा ट्रेंड झपाट्याने वाढत असून, या पारंपरिक पदार्थाला आधुनिक स्पर्श देत हिवाळ्यातील रात्री अधिक रंगतदार बनवत आहे. शेकोटी, मंद वारा, पाखरांची चाहूल आणि सुगंधी पोपटी या सगळ्यांनी मिळून हिवाळ्याचा आनंद अनेक पटींनी उंचावतो.