

नेवाळी : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दिवा परिसरात तब्बल 67 कोटी 57 लाखांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. मनसेचे दिवा-शीळ विभागाध्यक्ष शरद पाटील यांनी ठाणे महापालिका आयुक्तांकडे निवेदन देत या प्रकरणाची सखोल चौकशी व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कागदोपत्री काम पूर्ण झाल्याचा दाखला देऊन कोट्यवधींचा मलिदा लागल्याचा प्रकार मनसेने उजेडात आणला आहे. ठाणे महापालिका आयुक्तांकडे झालेल्या तक्रारीनंतर ही बाब समोर आली आहे. मनसेचे विभाग अध्यक्ष शरद पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मंजूर झालेल्या काही रस्त्यांच्या कामांची प्रत्यक्षात अंमलबजावणीच झाली नाही. परंतु तरीही त्या कामांची जोरदार बिले काढून महापालिकेला लाखो-कोटींचा गंडा घातला गेला आहे. शासनाचा निधी खर्च झाल्याचे दाखवून कागदोपत्री काम पूर्ण दाखवले गेले, असा मनसेचा आरोप आहे.
मनसेने ज्या सहा महत्त्वाच्या रस्त्यांची यादी ठाणे महापालिका आयुक्तांना दिली, त्यामध्ये शीळ-दिवा रोड, डोंबिवली-शीळ रोड, बीएसयूपी बिल्डिंग कौसा मार्केट रस्ता, सेक्टर 11 विकास योजना, कल्याण-डोंबिवली मुख्य मार्ग आणि डोमखार येथील शीळ-दिवा रोड ते पोलीस स्टेशन आरक्षण या सर्व रस्त्यांचा समावेश आहे. या सर्व रस्त्यांवर कामे शून्य, पण बिले मात्र कोट्यवधींची असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
असा प्रकार घडणे हे गंभीरच...
मनसेचे विभागाध्यक्ष शरद पाटील म्हणाले, “महापालिकेच्या अधिकारक्षेत्रात इतका मोठा आर्थिक गैरव्यवहार होणे म्हणजे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्षच झाल्यासारखे आहे. ठाणे महापालिका ही राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘अखंड ताब्यात’ आहे. तरीही असा प्रकार घडणे हे गंभीर स्वरूपाचे आहे. यामागे कोणाचे संरक्षण आहे, हे तपासले पाहिजे.” असे त्यांनी म्हटले आहे.