

डोंबिवली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हाही जाहीर होण्याच्या शक्यतेने राजकीय पक्षांमध्ये वातावरण चांगलेच तापले असताना दुसरीकडे कल्याण-डोंबिवलीतील तापमानाचा पारा मात्र दिवसागणिक कमी होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये शुक्रवारी 12.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर कल्याणात त्यापेक्षा थोडे अधिक म्हणजे 12.8 आणि डोंबिबलीत 13.4 अंश सेल्सिअस इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी दिली.
गेल्या वर्षी काहीशा उशिराने आणि काहीसा कमी मुक्काम केलेल्या थंडीने यंदा अगदी वेळेमध्ये आगमन केले नाही. तर अगदी सुरुवातीपासूनच आपल्या गुलाबी थंडीची चुणूक दाखवून दिली आहे. दिवाळीनंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून तापमानात घसरण जाणवू लागली होती. तर आताच्या सुरू असलेल्या आठवड्यात तर थंडीने कमाल करत यंदाच्या मौसमातील आपल्या किमान तापमानाची नोंद केली. दोन दिवसांपूर्वी कल्याण-डोंबिवलीसह संपूर्ण एमएमआर रिजनमध्ये तापमान लक्षणीयरित्या कमी नोंदविण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीतील तापमानाचा पारा उतरत चालला आहे. त्यामुळे शुक्रवारी लागोपाठ दुसऱ्या दिवशी यंदाच्या महिन्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. गुरुवारी कल्याण-डोंबिवलीमध्ये 13 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यापाठोपाठ शुक्रवारी कल्याण-डोंबिवलीतील तापमान कमी झाले असून कल्याणमध्ये तर 12.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले आहे. तर महाबळेश्वरमध्ये 12.2 अंश से. तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी दिली. डोंबिवलीचा पाराही शुक्रवारी 13.4 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आल्याचे मोडक यांनी सांगितले.