Dadar Dahanu local train confusion: दोन टप्प्याच्या दादर-डहाणू लोकलमुळे प्रवासी त्रस्त

एकाच टप्प्यात गाडी चालविण्याची मागणी
Local Train Update
Local Train UpdatePudhari
Published on
Updated on

सफाळे: दादर ते डहाणू रोड दरम्यान धावणाऱ्या लोकलला दोन टप्प्यांमध्ये वेगवेगळे क्रमांक देण्यात आल्याने प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ निर्माण होत असून, या लोकलला पुन्हा एकाच टप्प्यात सुरू करून स्थानकांवरील उद्घोषणा व इंडिकेटरवर ‌‘डहाणू लोकल‌’ अशी स्पष्ट माहिती देण्याची मागणी प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे.

पूर्वी 93027 क्रमांकाची दादर-डहाणू लोकल अनेक वर्षे दादरहून सायंकाळी 4.47 वाजता सुटून थेट डहाणू रोडपर्यंत धावत होती. मात्र 1 नोव्हेंबर 2018 पासून लागू केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार या गाडीला 90791 असा नवीन क्रमांक देत ती दादर-विरार अशी करण्यात आली. त्यानंतर विरारहून 93031 क्रमांकाने विरार-डहाणू अशी स्वतंत्र लोकल सुरू करण्यात आली.

Local Train Update
Tempo Overturn Traffic Jam: डोंबिवली-अंबरनाथ महामार्गावर टेम्पो पलटी

डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने पाठपुरावा आणि रेल्वे प्रशासनाकडे निवेदने दिल्यानंतर ही लोकल पुन्हा दादर-डहाणू मार्गावर सुरू करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात हीच गाडी 90667 दादर-विरार आणि 93033 विरार-डहाणू अशा दोन टप्प्यांत व वेगवेगळ्या क्रमांकाने धावत असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दादर स्थानकावर या गाडीची ‌‘डहाणू लोकल‌’ म्हणून उद्घोषणा होत नसून इंडिकेटरवरही ‌‘विरार लोकल‌’ असेच दर्शविले जात असल्याने डहाणूकडे जाणाऱ्या प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होतो. तसेच विरार स्थानकावर गाडी आल्यानंतर विरार येथे उतरणारे प्रवासी उतरेपर्यंत डहाणूकडे जाणारे प्रवासी घाईघाईने गाडीत चढत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

Local Train Update
Mumbai Airport: उद्या मुंबई विमानतळ ६ तास राहणार बंद; नेमकं कारण काय?

दादर-डहाणू अधिकृत जाहीर करावी...

प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे ही लोकल एकाच टप्प्यात दादर-डहाणू अशी अधिकृतपणे जाहीर करावी, दादर स्थानकावर ‌‘डहाणू लोकल‌’ म्हणून उद्घोषणा इंडिकेटर व्यवस्था करावी, तसेच पिक अवरमधील वाढती गर्दी लक्षात घेता ही लोकल 15 डब्यांची चालवावी, अशी मागणी केली आहे. यापूर्वी विरार-संजाण-सुरत मेमू गाडीही दोन टप्प्यांत धावत होती. मात्र

3 जानेवारीपासून ती एकाच टप्प्यात विरार-सुरत अशी सुरू केली. त्याच धर्तीवर दादर-डहाणू लोकलही चालवून प्रवाशांना दिलासा द्यावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news