Bhiwandi Kamwari River Flood: कामवारी नदीच्या रौद्ररूपात पार्किग केलेली मिनीबस वाहून गेली

भिवंडीत पहाटेची थरारक घटना, पावसामुळे नदी दुथडी
Bhiwandi Kamwari River Flood
Bhiwandi Kamwari River FloodPudhari
Published on
Updated on

संजय भोईर

भिवंडी: भिवंडीत रात्री झालेल्या मुसळधार पावसाने कामवारी नदीने पुन्हा एकदा रौद्ररूप धारण केले. नदीला आलेल्या प्रचंड पुराच्या प्रवाहात नदीकाठावर उभी असलेली एक मिनीबस अक्षरशः वाहून गेल्याची थरारक घटना सोमवारी पहाटे घडली. सुदैवाने बसमध्ये कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरालगत वाहणारी कामवारी नदी रविवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे दुथडी भरून वाहू लागली. नदीच्या पाण्याचा वेग इतका वाढला की नदीकिनारी उभी असलेली मिनीबस पुराच्या लोंढ्याने ओढून नेली.

काही क्षणांतच बस नदीपात्रात वाहत गेली आणि पुलाखालून पुढे जात पाण्यात बुडाली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी नदीच्या प्रचंड प्रवाहात बस वाहून जात असल्याचे पाहताच एकच खळबळ उडाली.

Bhiwandi Kamwari River Flood
Accident News: अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघातात डॉक्टर दाम्पत्य गंभीर जखमी

घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची गर्दी झाली. मात्र नदीचा वेग आणि पाण्याची पातळी धोकादायक असल्याने कोणालाही बसपर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही. घटनास्थळाजवळ महापालिका हद्दीतील लोकमान्य टिळक विसर्जन घाट असून शेजारील शेलार ग्रामपंचायत हद्दीतही विसर्जन घाट आहे.

या परिसरात अनेक वाहन दुरुस्तीची गॅरेज असून दुरुस्तीसाठी आलेली वाहने नदीकाठावर उभी केली जातात. त्यापैकी ही मिनीबस असल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिनीबस नेमकी कोणाच्या मालकीची आहे, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर बस बाहेर काढण्यासाठी यंत्रणेकडून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे समजते.

Bhiwandi Kamwari River Flood
Kamothe Ceiling Collapse: कामोठ्यात छत कोसळून एकाचा मृत्यू, एक मुलगी गंभीर जखमी

नदीकाठावरील वाहनांना पुराचा धोका

कामवारी नदीला पूर आल्यानंतर नदीलगत उभी असलेली वाहने धोक्यात येण्याची ही पहिलीच घटना नाही. प्रत्येक पावसाळ्यात नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्याने नदीकिनारी वाहने उभी करण्यावर नियंत्रण आणण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news