

मुरबाड शहर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61ला जोडणारा काळू नदीवरील न्याहाडी पूल अपघातांना आमंत्रण देणारा ठरत असून प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे येथील नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. संरक्षणात्मक कठडे नसलेल्या या पुलावरून बुधवारी एक मालवाहू ट्रक थेट नदीत कोसळल्याची घटना घडली. या घटनेत जीवितहानी टळली असली, तरी हा अपघात प्रशासनासाठी गंभीर इशारा मानला जात आहे.
दरम्यान, पाच महिन्यांपूर्वी याच पुलावर रात्रीच्या सुमारास मोटरसायकल घसरून खाली कोसळल्याने एक दुचाकीस्वार मोहम्मद मैफुज आलम हा जागीच ठार झाला होता, तर दुसरा गंभीर जखमी झाला होता, अशी धक्कादायक माहिती ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाष आप्पा घरत यांनी दिली. एवढी गंभीर घटना घडूनही संबंधित यंत्रणांनी कोणतीही ठोस दखल घेतली नाही, ही बाब अधिकच संतापजनक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
घरत यांनी पुढे सांगितले की, पुलाच्या ठिकाणी तीव्र वळण, वाळूचा सतत पसारा आणि कठड्यांचा अभाव हे अपघातांचे प्रमुख कारण आहे. तरीही संबंधित बांधकाम विभाग यांच्याकडून केवळ बघ्याची भूमिका घेतली जात आहे. या संपूर्ण प्रकरणी संबंधित बेजबाबदार विभागावर त्वरित गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
या मार्गावरून दिवस-रात्र अवजड वाहतूक सुरू असते. त्यातच राष्ट्रीय महामार्ग 61 चे काम सुरू असल्याने 15 ते 20 किमी रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सध्या खासगी वाहनांसह इतर लहान वाहने, दुचाकी, प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात याच पुलावरून सुरू असल्याचे दिसते. परंतु तो असुरक्षित असल्याने अशा परिस्थितीत हा पूल म्हणजे प्रवाशांसाठी जीवघेणा सापळाच बनला आहे.
विशेष म्हणजे, पुलाशेजारील रस्त्याचे कारण नसताना कोट्यवधी रुपये खर्चून काँक्रीटीकरण करण्यात आले, मात्र काही महिन्यांतच त्या रस्त्याला तडे गेले आहेत. दुसरीकडे, मूळ पूल मात्र कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने अधिकच धोकादायक बनत चालला आहे.
स्थानिक नागरिकांकडून आता तातडीने नवीन, मजबूत व दोन्ही बाजूंना संरक्षण कठडे असलेल्या पुलाच्या उभारणीची आणि दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची जोरदार मागणी होत आहे.
टेंभरे (बु.) गावाच्या पुलाकडेही दुर्लक्ष...
तालुक्यातील टेंभरे (बु.) गावासाठी रहदारीसाठी असलेला मुरबाडी नदीवरील पूल हा एकमेव रहदारीचा मार्ग असून तोच सध्या धोक्यात आला आहे. या पुलाची अवस्था देखील अति जीर्ण स्वरूपात असल्याने नागरिक भयभीत आहेत. जर पूल बंद पडला किंवा कोसळला, तर तालुक्याशी गावाचा संपर्क तुटेल. हल्ली तालुक्यातील नदी पूल असलेल्या गावांची रहदारी पूर्णपणे असुरक्षित झालेली पाहायला मिळत आहे.