

मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांवरून उद्भवलेला वाद मिटवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यावर सोपवली होती मात्र त्यांनी हा वाद मिटवला नाहीच शिवाय मराठी- जैन समाजात भांडणे लावणाऱ्या जैन मुनी नयन पद्मसागर यांना पाठबळ दिल्याचा आरोप जैन मुनी निलेश चंद्र यांनी दिला आहे. दरम्यान आम्ही गिरगावकर या संघटनेशी असलेला वाद पुढाकार घेवून मिटवला, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
मराठी-जैन वादात जैन समाजाचा थेट सहभाग नसून मंत्री लोढा यांच्याशी संबंध असलेल्या विकासकांनी तो पेटवल्याचा आरोप निलेश चंद्र यांनी केला. यापुढे मंत्री लोढा यांच्या ठिकठिकाणच्या टॉवरमध्ये जाऊन जय महाराष्ट्र आणि जय जिनेंद्र असे लिहिणार असल्याचा इशाराही निलेश चंद्र यांनी दिला.
कबुतरांना खाद्य घालण्यावरून निर्माण झालेल्या वादात आम्ही गिरगावकर संघटनेने उडी घेत हा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा दिला होता. त्यानंतर या संघटनेने अनेक ठिकाणी कबुतरांना दाणे घालण्यास विरोध केला होता. मराठी संस्कृतीच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याला धडा शिकवू असा इशाराही या संघटनेने दिला होता.
या पार्श्वभूमीवर हा वाद मिटवण्यासाठी आम्ही गिरगावकर संघटनेशी निलेश चंद्र यांनी बुधवारी मुंबई प्रेस क्लबमध्ये चर्चा केली. त्यानंतर हा वाद मिटल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आम्ही गिरगावकर संघटनेचे गौरव सागवेकर, शिल्पा नायक, मिलिंद वेदपाठक उपस्थित होते.
मराठी माणसांच्या मांसाहाराचा वाद जैन मुनी नयन पद्मसागर यांनी 7 वर्षांपूर्वी उकरून काढत दोन समाजांमध्ये तेढ निर्माण केली होती असा आरोप निलेश चंद्र यांनी माध्यमांशी बोलताना केला.