

मुरबाड शहर : किशोर गायकवाड
मुरबाड शहरातील वाढती धूळ, घसरलेली दृष्यमानता आणि त्यातून नागरिकांच्या आरोग्याला निर्माण झालेला धोका यावर दैनिक पुढारीने सातत्याने प्रहार करत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. प्रवासी, सामान्य नागरिक, व्यापारी व पोलिस कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडत पुढारीने या गंभीर प्रश्नाचा पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने दि. 4 जानेवारी रोजी पुढारीत सविस्तर बातमी प्रसिद्ध करून प्रशासनाला स्पष्टपणे सूचित करण्यात आले होते. त्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली असून शहरातील धुळीच्या ठिकाणी सकाळी पाणी फवारणी सुरू करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना काहीअंशी दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे, उत्खनन, मातीचे ढिगारे आणि अवजड वाहनांच्या रहदारीमुळे शहरात निर्माण झालेल्या धुळीचा थेट फटका नागरिकांच्या आरोग्यावर बसत होता. डोळ्यांची जळजळ, श्वसनाचे त्रास, खोकला यांसारख्या तक्रारी वाढत असताना प्रशासनाकडून मात्र दीर्घकाळ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत होता.
पुढारीने हा विषय सातत्याने उचलून धरल्याने अखेर पाणी फवारणीस सुरुवात झाली आहे. मात्र नागरिकांमध्ये आता एकच प्रश्न उपस्थित होत आहेही पाणी फवारणी कायमस्वरूपी राहणार आहे का, की पुन्हा धूळ वाढल्यानंतर नव्याने बातम्या छापल्या गेल्यावरच प्रशासन हलणार? तात्पुरत्या उपाययोजनांपेक्षा दीर्घकालीन आणि ठोस नियोजनाची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दैनिक पुढारीने याआधीही स्पष्ट केले आहे की, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असताना केवळ एक-दोन दिवसांची कारवाई पुरेशी नाही. त्यामुळे धूळ नियंत्रणासाठी नियमित पाणी फवारणी, मातीचे ढिगारे हटवणे, आच्छादन नसलेल्या वाहनांवर कारवाई या उपाययोजना सातत्याने राबवल्या जातात की नाही, यावर नागरिकांच्या हितासाठी लक्ष राहणार आहे.