

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांना अर्वाच्य शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. आव्हाड यांनी धमकी देणाऱ्याच्या दोन्ही मोबाईल क्रमांकासह माहिती 'एक्स'वर दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
ठाण्यात आई तुळजाभवानीचे मंदिर उभारले आणि त्याचा सोहळा मोठ्या थाटामाटात झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी दर्शन घेतले. आव्हाड हे हिंदुविरोधी आहेत, अशी ओरड आणि आरोप नेहमीच विरोधकांकडून होत होते. मात्र, ठाण्यात प्रति तुळजाभवानीचे मंदिर उभारून सर्व विरोधकांचे तोंड बंद केले आहे. अशा वेळी आज आमदार आव्हाड यांना दोन क्रमाकांवरून अर्वाच्य भाषेत शिव्या देऊन जीवे ठार मारण्याची धमक्या देण्यात आलेल्या आहेत. ती माहिती आव्हाड यांनी पोलीस महासंचालक आणि ठाणे पोलिसांना 'एक्स' वर ट्विट करून दिली आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांना यापूर्वीही धमकी आली होती. विष्णोई टोळीच्या नावाने दोन कोटींच्या खंडणीसाठी कॉल आला होता. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आता पुन्हा एका सुमित देशमुख नावाच्या व्यक्तीने धमकी दिल्याचे आव्हाड यांनी नमूद केले आहे. याप्रकरणी पोलीस काय कारवाई करतात आणि त्या व्यक्तीने कोणत्या कारणास्तव धमकी दिली याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.