

केज : संतोष देशमुख यांची हत्या म्हणजे माणुसकीची हत्या असून या प्रकरणाचा तपास हा अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्फत करण्यात यावा. वाल्मीक कराड याने स्वतः व्हिडिओ काढून पोलिसांच्या स्वाधीन होणे म्हणजे पोलीस आणि तपास यंत्रणा यांचे अपयश असल्याचा घणाघात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. आम्ही शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांची लढाई लढत असून आमची लढाई ही अन्याय अत्याचाराविरुद्ध आहे, असे ते म्हणाले.
खा. सुप्रिया सुळे, आ. जितेंद्र आव्हाड, सचिन खरात यांनी आज (दि. १८) मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्या सोबत खा. बजरंग सोनवणे, आ. संदीप क्षीरसागर, माजी आ. सय्यद सलीम, महेबुब शेख, सचिन खरात, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के दयानंद स्वामी, डॉ. खळगे उपस्थित होते.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आ. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या हत्या कांडातील सर्व आरोपी आणि पोलीस अधिकारी या सर्वांचे सीडीआर यांची तपासणी व्हायला हवी. पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन तपासातील सर्व अपडेट्स याची माहिती द्यायला हवी. आमची लढाई ही कोण्या एका जाती विरूद्ध नसून शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांची लढाई आहे. या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड पोलिसांना सापडत नाही. परंतु, तो व्हिडिओ व्हायरल करीत सीआयडीच्या कार्यालयाच्या दारा पर्यंत जातो. तरी देखील पोलीस त्याला ताब्यात घेत नाहीत. असा तो कोण लागून गेला ? असे म्हणून त्यांनी पोलीस आणि तपास यंत्रणा यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. मंत्री धनंजय मुंडे यांच्या वरदहस्तामुळे तपास यंत्रणा निःपक्षपतीपणे तपास करू शकत नाहीत. म्हणून मुंडे यांचा राजीनामा घ्यावा. असे ते म्हणाले.
कराड हा जातीचा चेहरा नसून याला जातीय रंग देऊ नये. कारण मी सुद्धा वंजारीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कराड याला मदत करणारे, गाडीने त्याला नेवून सोडणारे आणि बडदास्त ठेवणारे या सर्वांची चौकशी व्हायला हवी. तसेच या प्रकरणाचा तपास पंकज कुमावत यांच्याकडे देण्याची मागणी आव्हाड यांनी यावेळी केली.