

पुढारी ऑनलाईन डेस्क - बॉलीवूडचा भाईजान सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळालीय. मुंबईतील वरळी ट्रॅफिक डिपार्टमेंटच्या व्हॉट्सॲप नंबरवर एका अज्ञाताने धमकी दिल्याचे वृत्त समोर आले आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सलमान खानच्या गाडीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देखील मिळालीय.
सलमान खानच्या मागे दीर्घकाळ लॉरेन्स बिश्नोई पडला आहे. अनेकदा जीवे मारण्याची धमकी देखील मिळाली आहे. त्याच्या घरी गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर गोळीबार देखील झाला होता. आता सलमान खानला पुन्हा एकदा घरात घुसून मारण्याची धमकी मिळाली आहे. सोबतच त्याची कार बॉम्बने उडवण्याची धमकी देखील मिळालीय.
सलमानने त्याच्या ‘सिकंदर’ चित्रपटाच्या प्रमोशन वेळी धमक्यांविषयी उघडपणे सांगितले होते. त्याने सांगितले होते की, भगवान, अल्लाह वर सर्व काही आहे. जितकं जगणे लिहिलंय, तितकं जगेन. परंतु, तो आपल्या परिवाराच्या सिक्युरिटी मुळे खूप चिंतेत राहतो. हेच कारण आहे की, यावेळी तो ईदला जेव्हा बाल्कनीमध्ये येऊन लोकांना शुभेच्छा दिल्या, त्यावेळी तो फुल प्रूफ सिक्युरिटी सोबत दिसला होता.
याआधीही सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. अज्ञात व्यक्तीने मेसेजमध्ये ट्रॅफिक पोलिस हेल्पलाईनवर ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचा दावा करणारा आरोपी बिकाराम जालाराम बिश्नोई राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले होते.