

नेवाळी : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील निघू, नागाव आणि नारिवली या तीन गावांच्या मध्यभागी विविध प्रकारचा औद्योगिक व रासायनिक कचरा टाकून तो पेटविण्याचे प्रकार पुन्हा जोमाने सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी यापूर्वी दोन ते तीन वेळा कारवाई करण्यात
आली असतानाही कचरा जाळण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
या भागात मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचा कचरा टाकून तो रात्रीच्या वेळी पेटविला जातो. दररोज रात्री सुमारे 11 ते पहाटे 2 या वेळेत कचरा जाळला जात असल्याने परिसरात दाट धूर पसरत आहे. या धुरामुळे निघू, नागाव, नारिवली तसेच आसपासच्या गावांमध्ये दुर्गंधी पसरत असून नागरिकांना श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ तसेच इतर आजारांचा सामना करावा लागत आहे.
या गंभीर प्रकाराबाबत यापूर्वीही ‘दैनिक पुढारी’ने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला दिसत नाही.
रात्रीच्या वेळी परिसरात जाळण्यात येणारा कचरा पाहता याचा त्रास 14 गावांमधील नागरिकांना होत असून या वाढत्या प्रदूषणाच्या प्रश्नाकडे संबंधित विभागाकडून गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. यावर ठोस व सातत्यपूर्ण कारवाई न झाल्यामुळे कचरा माफियांचे धाडस वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे या भागामध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणावर कचरा टाकून तो पेटविण्याचे प्रकार सुरूच राहिले आहेत. यामुळे संपूर्ण परिसर प्रदूषणाच्या विळख्यात सापडत असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची भीती व्यक्त होत आहे.
ग्रुप ग्रामपंचायत वाकळणच्या माजी सरपंच पिंकी पाटील यांनी या संदर्भात प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन रात्री होणाऱ्या कचरा जाळण्याच्या प्रकारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या प्रकाराविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे 14 गावांच्या सुरक्षिततेबाबत नवी मुंबई महानगरपालिका कधी गांभीर्याने कठोर पाऊल टाकणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.