

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली परिसरात 18 ते 19 वयोगटातील विद्यार्थ्यांना ट्रेडिंगच्या आमिषाने गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहे. ठगांनी विद्यार्थ्यांकडून विविध कागदपत्रे घेऊन त्यांच्या नावावर बँक खाती उघडली आणि त्या खात्यांमधून लाखो रुपयांची उलाढाल केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात सुमारे 50 ते 60 विद्यार्थी फसवणुकीचे बळी ठरल्याची माहिती समोर आली आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, काही विद्यार्थ्यांना त्यांच्या परिचित मित्रांमार्फत ऑनलाईन ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे अमिष दाखविण्यात आले. यासाठी बँक खाते उघडण्याची गरज असल्याचे सांगत विद्यार्थ्यांकडून आधार कार्ड आणि पॅन कार्डसारखी महत्त्वाची कागदपत्रे घेतली गेली. त्यानंतर संबंधित खात्यांमधून लाखो रुपयांची व्यवहार उलाढाल झाल्याचे दोन वर्षांनी विद्यार्थ्यांच्या लक्षात आले.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना घेऊन परिमंडळ 3 चे उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या खात्यांचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी उपायुक्त झेंडे यांनी संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच विद्यार्थ्यांनी कोणत्याही व्यक्तीला आपली वैयक्तिक कागदपत्रे, बँक तपशील किंवा ओटीपी देऊ नयेत, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, कल्याण-डोंबिवली परिसरात अशा प्रकारचे आणखी काही प्रकार घडले आहेत का, याबाबत पोलिस सखोल चौकशी करत आहेत. एकीकडे या घोटाळ्याचा भांडाफोड करण्याची मागणी फसगत झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून होत आहे. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या निष्काळजीपणाचा गैरफायदा घेणाऱ्या टोळीविरोधात कडक कारवाई व्हावी, अशी मागणी पालकांकडूनही होत आहे.