

महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील रावढळकोसबी येथे संरक्षण भिंत बांधणे तसेच जेटी दुरुस्ती या महत्त्वपूर्ण विकासकामांचा शुभारंभ रविवारी महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खार विकास मंत्री नामदार भरत गोगावले यांच्या हस्ते पार पडला.
शुभारंभ प्रसंगी राजिप माजी सदस्य निलेश ताठरे, शिवसेना विभाग प्रमुख अनंत सावंत, युवासेना तालुका प्रमुख रोहिदास आंबवले, साक्षी बटावले, युवासेनेचे विनय बटावले, नितेश कदम, संतोष घुलघुले यांच्यासह शिवसेना व युवासेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, स्थानिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संरक्षण भिंतीमुळे समुद्रातील भरतीचे खारे पाणी शेतजमिनीत शिरणार नाही, त्यामुळे शेती व पिकांचे होणारे नुकसान टळणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच जेटी दुरुस्तीमुळे कोसबीच्या किनाऱ्यावरून पलिकडे किनाऱ्यावर जाणे अधिक सुरक्षित व सुलभ होणार आहे तसेच सदर जेटीचा फायदा मच्छीमार बांधवांना आणि स्थानिक व्यावसायिकांना होऊन परिसराच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याचे उद्घाटन प्रसंगी मंत्री नामदार भरत गोगावले यांनी प्रतिपादन केले.
खाडीपट्टयाला मोठया प्रमाणात लाभलेले खाडीचे क्षेत्र त्यामुळे ठिकठिकाणी जल वाहतूकीच्या माध्यमातून होणारी वाहतूक सुरळीत व्हावी त्यामुळे ठिकठिकाणच्या जेटीची झालेली दुरवस्था पाहता नजिकच्या काळात या सर्व जेटींच्या दुरुस्तीची कामे हाती घेऊन त्यांचा चांगल्याप्रकारे विकास होऊ शकला आहे ज्यामुळे जेटीच्या माध्यमातून खाडीपलिकडील गावांमध्ये होडीच्या माध्यमातून प्रवास करणे सोयीचे ठरत आहे.
कामांमुळे रावढळ-कोसबी परिसरातील शेती, मत्स्यव्यवसाय आणि दळणवळण अधिक सक्षम होणार असून स्थानिक नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीला न्याय मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. होणाऱ्या संरक्षण भिंतीमुळे समुद्रातील भरतीचे खारे पाणी शेतजमिनीत शिरणार नाही, त्यामुळे शेती व पिकांचे होणारे नुकसान टळणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.