

ठाणे : मुंबई महानगर क्षेत्रामध्ये वायूप्रदूषण संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई केली असून एकूण 10 रेडी मिक्स काँक्रीट प्लांट बंद केले आहेत. तर एकूण 84 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मुंबई महानगर क्षेत्रामध्ये हवा प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी तसेच नियमांची काटेकोर अंमलबाजावणी व्हावी यासाठी एमपीसीबीकडून आरएमसी प्लांटचे आणि बांधकाम सुरु असणाऱ्या प्रकल्पांचे सर्वेक्षण करण्यासाठी भरारी पथक नेमण्यात आले आहे. या पथकाकडून मागील दोन दिवसात 44 आरएमसी प्लांटची तपासणी करण्यात आली होती.
यावेळी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या स्वामीनारायण लाईफस्पेस एल. एल. पी. डोबिंवली, मे. जे. आर. बी. इंन्फ्रास्टक्चर प्रा. लि. (कल्याण), श्रीराम इंटरप्रायजेस (टेंबघर,अंबरनाथ), प्रिझम जॉनसन लि.(भिंवडी), एल. ॲण्ड टी. (भिंवडी), कृष्णा कन्सट्रक्शन्स् (दहीसर मोरी), प्रकाश इंजिनियरर्स ॲण्ड इन्फ्रा प्रोजेक्टस् (तुर्भे), ए. पी. कन्सट्रक्शन्स् (तुर्भे), गजानन साईदत्त ॲसोसिएटस (विरार), आर. डी. एस. प्रोजेक्ट (वरळी) या 10 प्लांटवर बंदची कारवाई करण्यात आली आहे.
चार प्लांटना मंडळाकडून अंतरिम निर्देश
मुंबई महानगर क्षेत्रातील 17 आरएमसी प्लांटला प्रास्तावित आदेश देत 84 लाख दंड वसुल करण्यात आला आहे. त्यात कल्याण येथील 9, नवी मुंबईतील 1 आणि रायगड येथील 7 प्लांटचा समावेश आहे. तसेच चार प्लांटला मंडळाकडून अंतरीम निर्देश देण्यात आले आहेत. बांधकाम सुरु असणाऱ्या एकूण 29 मोठया प्रकल्पांची तपासणी भरारी पथकाकडून करण्यात आली पैकी 5 प्रस्तावित प्रकल्पांना अंतिम निर्देश देण्यात आले आहेत. डिसेंबर महिन्यापासून आतापर्यंत एकूण 240 आरएमसी प्लांटची तपासणी करण्यात आली असून एकूण 4 कोटी 35 लाख इतका दंड वसुल करण्यात आला आहे. ही मोहीम सुरु राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देण्यात आली आहे.