

भिवंडी : समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आजमी व भिवंडी पूर्व विधानसभा समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांच्यातील वादंग शिगेला पोहचला असून आ. रईस शेख यांनी त्याचा बदला घेण्यासाठी थेट काँग्रेस सोबत हातमिळवणी करून आपल्या समर्थकांना काँग्रेसच्या उमेदवारी देत समाजवादी पक्षासमोर आव्हान उभे केले. सुरवातीला छुप्या पद्धतीने सुरू असलेला आ. शेख यांचा काँग्रेस प्रचार आता उघडपणे सुरू केला आहे.
भिवंडी पूर्व विधानसभा क्षेत्रातील अनेक प्रभागांमध्ये आ.शेख प्रचारात सहभागी होत आहेत. परंतु आ.शेख येण्यापूर्वी उमेदवारांसह सर्व उपस्थितांना अंगावरील काँग्रेसचे उपरणे बाजूला काढून ठेवावे लागत आहेत. काँग्रेस उमेदवारांचा आ. रईस शेख यांनी उघड प्रचार सुरू केला असला तरी माध्यमांसमोर बोलण्यास त्यांनी आता पर्यंत नकार देत 16 तारखेच्या निकाला नंतर मी माझी भूमिका स्पष्ट करेल अशी मोघम प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
विशेष म्हणजे त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांना पत्र देऊन आ. शेख यांनी अबू आजमी यांच्या कार्यपद्धती बाबत निषेध व्यक्त केला होता. काल रात्री प्रभाग क्रमांक 9 मधील काँग्रेस पक्षाच्या प्रचार सभेमध्ये रईस शेख यांनी आपली एन्ट्री मारत काँग्रेस कार्यकर्त्यांना जोरका धक्का धीरे से लगा आशी परिस्थिती करुन ठेवली.
त्यावेळी सावधगिरी म्हणून व्यासपीठावरील काँग्रेस उमेवारांसह सगळ्यांनी आपल्या गळ्यातील काँग्रेसचे उपरणे गुंडाळून ठेवले. तर एका ठिकाणी काँग्रेस पक्षाचे चिन्ह हात यावर मतदान करा असे आवाहन आमदार रईस शेख करीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हिंमत असेल तर समाजवादी पक्षाच्या उमेदवारांनी माझा फोटो न वापरता प्रचार करून निवडणूक लढवून आणि जिंकून दाखवावी असे आव्हान दिले आहे. अशा प्रकारचे भाष्य रईस शेख या व्हायरल व्हिडीओत करत आहेत. यामुळे भिवंडीमध्ये राजकीय वर्तळात घडामोडींना चांगलाच वेग आला झाला आहे.
पक्षश्रेष्ठी योग्य ती कारवाई करतील
समाजवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष भिवंडी प्रचार प्रमुख अजय यादव यांच्या कडून पक्षाची भूमिका जाणून घेतली असता, पक्षाने त्यांना 2019 मध्ये संधी दिली तेव्हा त्यांची निवडून आणण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी उचलली होती. त्यामुळे पक्ष कॅडर कार्यकर्त्यांवर चालतो, त्यामुळे भिवंडीत या कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही नक्कीच विजय मिळवू असे स्पष्ट करीत आ.रईस शेख यांच्या भिवंडीतील पक्षविरोधी कारवायांचा अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठवला असून पक्ष श्रेष्ठी योग्य वेळी योग्य ती कारवाई करतील असा विश्वास अजय यादव यांनी व्यक्त केला आहे.