

Signs of an alliance between MNS and Ubatha
ठाणे : तळागाळात मनसे आणि ठाकरे गटाचीच ताकद आहे. त्यामुळे निवडणुकीची तयारी करा, कामाला लागा असा कानमंत्र देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी महापालिकांच्या निवडणुकीत अप्रत्यक्षपणे मनसे आणि उबाठाच्या युतीचे संकेत दिले आहेत. एक महिन्यांनंतर पुन्हा एकदा राज ठाकरे बैठक घेणार असून या एका महिन्यात काम केले याची विचारणा देखील मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करणार असल्याचे ठाकरे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ठणकावून सांगितले.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा ठाण्यातील सीकेपी हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. यावेळी आगामी महापालिका निवडणुकांची रणनिती कशा पद्धतीने हवी यासंदर्भात राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
विविध प्रकारच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही ठाकरे बंधूंचे कौटुंबिक मनोमिलन झाले असले तरी, आगामी पालिका निवडणुकीसाठी हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील का? याबाबत संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात उत्सुकता लागली आहे. ठाण्यात घेण्यात आलेल्या या मेळाव्याला राज ठाकरे युतीसंदर्भात काय भूमिका मांडतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र प्रत्यक्ष युतीसंदर्भात भाष्य न करता ठाकरे यांनी या मेळाव्यात अप्रत्यक्षपणे पालिका निवडणुकीसाठी युतीचे संकेत दिले आहेत.
मनसे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कान पिचक्या देखील दिल्या आहेत. निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश देण्याबरोबरच एकमेकांशी न भांडता निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश यावेळी ठाकरे यांनी दिले.
मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे म्हणाले, तळागाळात मनसे आणि ठाकरे गटाचीच ताकद आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कामाला लागा, मतदार यादी तयार करा, मतदार याद्यांकडे लक्ष द्या, बुथ एजेंट मजबूत करा, विशेष म्हणजे खालच्या पातळीवरून काम करा, असा कानमंत्र यावेळी ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला. एक महिन्यात मी तुम्हाला पुन्हा विचारणार काय काम केले आणि लवकरच पुन्हा एकदा पदाधिकाऱ्यांचा मेळावा लावणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.