

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभाग रचना शुक्रवारी रात्री जाहीर केली. यापूर्वी 2015 मध्ये नवी मुंबईत ‘एक वॉर्ड एक नगरसेवक’ या धर्तीवर निवडणूक झाली होती. मात्र यंदा प्रथमच चार नगरसेवकांचा एक प्रभाग तयार करण्यात आला आहे.
नव्या प्रभाग रचनेनुसार 111 नगरसेवकांसाठी 28 प्रभाग झाले आहेत. 27 प्रभागात प्रत्येकी चार नगरसेवक तर एका प्रभागातून तीन नगरसेवक निवडून जाणार आहेत. नवीन रचनेत अनेक ठिकाणी प्रभागांची तोडफोड झाली असावी, या शंकेनेच प्रस्थापित अस्वस्थ झाले आहेत. नवी मुंबई महापालिकेची 2015 मध्ये झालेली निवडणूक स्वतंत्र प्रभाग रचनेनुसार झाली होती. त्यावेळी प्रभाग आणि नगरसेवकांची संख्या 111 होती. नव्या प्रभाग रचनेत नगरसेवकांची संख्या निवडणूक आयोगाने कायम ठेवली आहे. कल्याणमधील 14 गावांचा समावेश होऊनही नगरसेवक वाढलेच नाहीत. कल्याण तालुक्यातील 14 गावांचा महापालिकेत नव्याने समावेश झाला आहे. त्यामुळे नवी मुंबईत नगरसेवकांची संख्या वाढेल अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली.
नव्याने समावेश झालेली 14 गावे पावणे गाव आणि तुर्भे स्टोअर्स या जुन्या प्रभागांना जोडण्यात आली आहेत. त्यामुळे नव्या प्रभाग रचनेत 14 क्रमांकाचा प्रभाग हा क्षेत्रफळाच्या मानाने सर्वात मोठा ठरला आहे. 6 आणि 20 क्रमांकाचे प्रभाग क्षेत्रफळाने मोठे आहेत.प्रभाग क्रमांक 28 मध्ये फक्त तीनच सदस्य असणार आहेत. 17 क्रमांकाच्या प्रभागाची लोकसंख्या 45 हजार 616 इतकी आहे. त्यामुळे हा प्रभाग सर्वात जास्त लोकसंख्येचा ठरला आहे. सर्वात कमी लोकसंख्या प्रभाग क्रमांक 28 मध्ये 28 हजार 675 इतकी आहे. 16 प्रभागातील लोकसंख्या 40 ते 45 हजारांच्या दरम्यान आहे.